क्रिकेटच्या कौशल्यात भारत श्रेष्ठ, आम्ही नाही पोहचू शकत: सर्फराझ

वृत्तसंस्था
Monday, 24 September 2018

भारताला या स्पर्धेत प्रथम दोनच्या पलीकडचे आव्हान पार करावे लागणार होते, परंतु फॉर्मात असलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी शतके करून 210 धावांची सलामी दिली आणि पाकिस्तानी गोलंदाजी पूर्णतः निष्प्रभ केली. स्पर्धेत दुसरे शतक ठोकणारा धवन धावचीत झाला. 

दुबई : क्रिकेटच्या कौशल्यात भारत श्रेष्ठ आहे, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही; परंतु अंतिम सामन्यापर्यंत आम्ही त्यात सुधारणा करू, अशी कबुली पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदने भारताकडून झालेल्या सलग दुसऱ्या दारुण पराभवानंतर दिली. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारताने नऊ विकेटने विजय मिळवला. 

सुपर फोरमधील सलग दुसरा सामना जिंकून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या अफगाणिस्तानविरुद्ध सामना होत असून, त्यामध्ये राखीव खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते; तर निर्णायक सामन्यात भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत होत आहे. 

गटसाखळीत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर रविवारच्या सुपर फोरमधील सामन्यातबाबत कमालीची उत्सुकता होती; परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तानला प्रतिकार करण्याचीही संधी दिली नाही. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची 3 बाद 58 अशी अवस्था झाली होती, परंतु सर्फराझ आणि शोएब मलिक यांनी डाव सावरल्यानंतरही पाकिस्तानला 237 धावांत रोखण्याची कामगिरी भारतीय गोलंदाजांनी केली. 

भारताला या स्पर्धेत प्रथम दोनच्या पलीकडचे आव्हान पार करावे लागणार होते, परंतु फॉर्मात असलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी शतके करून 210 धावांची सलामी दिली आणि पाकिस्तानी गोलंदाजी पूर्णतः निष्प्रभ केली. स्पर्धेत दुसरे शतक ठोकणारा धवन धावचीत झाला. 

भारतीयांनी विजयाचे लक्ष्य 63 चेंडू शिल्लक ठेवून पार केले असले, तरी सर्फराझने आम्हाला 20 ते 30 धावा कमी पडल्या असे सांगितले. धवनच्या तुलनेत रोहित सुरवातीला संयमी होता, परंतु त्याला 14 आणि 81 धावांवर अनुक्रमे इमाम उल हक आणि फखर झमाम यांच्याकडून जीवदाने मिळाली. असे झेल सोडले तर आम्ही जिंकू शकत नाही. क्षेत्ररक्षणाचा खडतर सराव केला आहे, पण नेमके कोठे चुकते आहे हेच समजत नाही; असे सर्फराझ म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या