इंग्लंड ओपन : सिंधूची सफाईदार सलामी

वृत्तसंस्था
Thursday, 12 March 2020

 जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली. तिने सलामीच्या लढतीत लंडन ऑलिंपिक उपविजेत्या बेईवान झॅंग हिला दोन गेममध्येच हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

मुंबई/नवी दिल्ली : जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली. तिने सलामीच्या लढतीत लंडन ऑलिंपिक उपविजेत्या बेईवान झॅंग हिला दोन गेममध्येच हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

बर्मिंगहॅमला आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सिंधूसाठी मार्ग खडतर आहे. मात्र, जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने कडवे आव्हान परतवताना २१-१४, २१-१७ असा दोन गेममध्येच विजय मिळवला. आता तिची लढत कोरियाच्या सुंग जी ह्यून हिच्याविरुद्ध होईल. 
गतवर्षी जागतिक स्पर्धा जिंकल्यानंतर सिंधू कोरिया स्पर्धेत खेळली होती, त्या aस्पर्धेत झॅंगने सिंधूला पराजित केले होते; मात्र या वेळी सिंधू सरस ठरली. आता दोघींतील लढतीत सिंधूची हुकूमतही ६-४ झाली आहे. 

या वर्षातील ही पहिलीच सुपर एक हजार दर्जाची स्पर्धा आहे. त्यात फसव्या रॅली करण्यात वाक्‌बगार असलेली झॅंग सिंधूची प्रतिस्पर्धी होती. मात्र ४२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावण्यात सिंधू यशस्वी ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने १६-१६ बरोबरीनंतर सलग पाच गुण जिंकण्यात यश मिळवले. 

दरम्यान, प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डी यांना पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. त्यांना सि वेई चेंग - या क्विआँग हुआंग यांच्याविरुद्ध १३-२१, २१-११, १७-२१ अशा पराभवास सामोरे जावे लागले.  चीनची जोडी अव्वल मानांकित आहे; पण प्रणव-सिक्कीने त्यांचा चांगलाच कस पाहिला. निर्णायक गेममध्ये मोक्‍याचे गुण गमावल्याचा फटका भारतीय 
जोडीस बसला. 

सिंधूचा नमस्ते
कोरोनाचा जगभरात प्रसार होत आहे, त्यामुळे सिंधूने आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिस्पर्धी तसेच पंचांबरोबर हस्तांदोलन करणार नाही, त्याऐवजी नमस्ते करणार असल्याचे सांगितले होते. ऑल इंग्लंडच्या सलामीच्या लढतीपासून तिने हे अमलातही आणले.


​ ​

संबंधित बातम्या