स्टेडियम बांधणे सोपे; प्रशिक्षक गवसणे कठीण : गोपीचंद

वृत्तसंस्था
Monday, 24 September 2018

खेळाडूंवरील ताण लक्षात घ्या
जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या कठोर नियमामुळे भारतीय खेळाडूंवर खूपच यंदा ताण आला आहे. अन्य खेळाडूंपेक्षा भारतीयांना दोन आठवड्यांची राष्ट्रकुल; तसेच दोन आठवड्यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेस सामोरे जावे लागले. आता आगामी १२ आठवड्यांत खेळाडू फ्रान्स, बर्लीन, मलेशिया आणि चीनमध्ये खेळतील. त्यांना रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. हे सर्व लक्षात घेतल्यास भारतीयांचा दमसास कमी आहे, असे कसे म्हणतात. सतत खेळल्यावर कधी तरी कामगिरी खालावणारच, असे गोपीचंद यांनी सांगितले.

मुंबई : भारतास जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटू घडवायचे असतील, तर देशातील प्रशिक्षण यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. माजी खेळाडूंनी पूर्णवेळ मार्गदर्शक व्हावे, यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेनेच योजना तयार करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय बॅडमिंटन मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

जागतिक कुमार स्पर्धेसाठी निवड चाचणी चंडिगडला सुरू आहे, त्या वेळी गोपीचंद यांनी हे मत व्यक्त केल्याचे वृत्त आहे. प्रशिक्षण यंत्रणेत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. खेळाडू प्रशिक्षण सुरू केले, तर चांगलेच आहे. त्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने योजना तयार करण्याची गरज आहे. किंवा तळागाळापासून चांगल्या मार्गदर्शकांचा शोध घेऊन त्यांना तयार करावे लागेल. चांगले खेळाडू हवे असतील, तर त्यासाठी चांगली प्रशिक्षण यंत्रणाही हवी, असे ते म्हणाले.

एकवेळ स्टेडियम उभारणे सोपे आहे; पण खेळाच्या प्रगतीसाठी झटणारे, झोकून देणाऱ्या व्यक्ती शोधणे कठीण आहे. आपल्याकडे खेळाडू घडवण्याची कोणतीही योजना नाही. आपले प्रशिक्षक उच्च दर्जाचे नाहीत. त्यांना कसे घडवायचे, हेच आपल्याला माहिती नसावे, असेही गोपीचंद म्हणाले. प्रशिक्षकांना चांगले मानधन मिळाले, तरच खेळाचे चांगले ज्ञान असलेल्या व्यक्ती त्यात येतील. सध्या आपण मार्गदर्शनास जास्त महत्त्वच देत नाही, हेच आपल्यासमोरील आव्हान आहे. 

खेळाडूंवरील ताण लक्षात घ्या
जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या कठोर नियमामुळे भारतीय खेळाडूंवर खूपच यंदा ताण आला आहे. अन्य खेळाडूंपेक्षा भारतीयांना दोन आठवड्यांची राष्ट्रकुल; तसेच दोन आठवड्यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेस सामोरे जावे लागले. आता आगामी १२ आठवड्यांत खेळाडू फ्रान्स, बर्लीन, मलेशिया आणि चीनमध्ये खेळतील. त्यांना रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. हे सर्व लक्षात घेतल्यास भारतीयांचा दमसास कमी आहे, असे कसे म्हणतात. सतत खेळल्यावर कधी तरी कामगिरी खालावणारच, असे गोपीचंद यांनी सांगितले.

राष्ट्रीय मार्गदर्शकांच्या सूचना
 राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणीऐवजी कुमार गटात विभागीय चाचणी असावी
 केरळ किंवा आसामहून चंडीगडमधील स्पर्धेला यायचे आणि पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली, तर ते जास्त त्रासदायक
 कुमार खेळाडूंच्या पालकांवर किती आर्थिक ताण द्यायचा, हा विचार हवा
 प्रत्येक विभागीय स्पर्धेतील अव्वल १० खेळाडूंना अंतिम चाचणीत प्रवेश देता येईल

संबंधित बातम्या