एक हजारांश सेकंदाच्या फरकाने ठरतात विजेते

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 July 2021

पापणी लवते तेवढ्याच वेळाचा फरकही कदाचित जास्त अनुभवयाचा असेल तर जलतरणातील स्पर्धा बघावी. चार भिन्न स्ट्रोक्स तसेच एकच स्पर्धक एकाच शर्यतीत चार स्ट्रोक वापरत असलेली स्पर्धा म्हणजे जलतरण. फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय या चार स्ट्रोकच्या प्रकारात स्वतंत्र, तसेच एकत्रित स्पर्धाही होते.

पापणी लवते तेवढ्याच वेळाचा फरकही कदाचित जास्त अनुभवयाचा असेल तर जलतरणातील स्पर्धा बघावी. चार भिन्न स्ट्रोक्स तसेच एकच स्पर्धक एकाच शर्यतीत चार स्ट्रोक वापरत असलेली स्पर्धा म्हणजे जलतरण. फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय या चार स्ट्रोकच्या प्रकारात स्वतंत्र, तसेच एकत्रित स्पर्धाही होते. ५० मीटर अंतराच्या या तरण तलावात वेळ सेकंदाच्या एक हजारांश भागापर्यंत पाहिली जाते. आता या परिस्थितीत जलतरणपटूची नेमकी वेळ किती हे टचपॅड तंत्रज्ञानच सांगते.

जलतरणातील सर्वात कमी, तसेच सर्वात वेगवान शर्यत असते ५० मीटर फ्रीस्टाईल. ऑलिंपिक स्पर्धेतील सर्वात दीर्घ शर्यत असते १५०० मीटर, तर खुल्या पाण्यातील शर्यत दहा किलोमीटरचीही असते.

पोहणे नवीन नसल्याने पहिल्या स्पर्धेपासून त्याचा समावेश. अॅथलेटिक्सखालोखाल स्पर्धा शर्यती असलेल्या या खेळात वैयक्तिक पदकांची भरपूर लयलूट होते. १९७२ च्या म्युनिच स्पर्धेत मार्क स्पिट््झने सात सुवर्णपदके जिंकताना प्रत्येक शर्यतीत जागतिक विक्रम केला. त्याचा सर्वाधिक सात सुवर्णपदकाचा विक्रम फेल्प्सने २००८ च्या स्पर्धेत आठ सुवर्णरदक जिंकत मोडला.

किती पदके - पुरुष तसेच महिलांच्या विभागात प्रत्येकी १७ शर्यतीत होतात. त्याचबरोबर ४ बाय १०० मीटरची मीडले मिश्र शर्यतही असते.
कालावधी - २४ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान टोकियो अॅक्वेटीक सेंटर 
भारतीय आव्हान - प्रथमच भारताचे चार जलतरणपटू ऑलिंपिकला आहेत. मात्र त्यांनी उपांत्य फेरी गाठली तरी त्यांच्यासाठी ते खूप मोठे यश असेल.

रिओत काय घडले - अमेरिकेने ३३ पैकी १६ सुवर्णपदके जिंकत हुकूमत राखली. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे (१०) कडवे आव्हान परतवले. अखेरची ऑलिंपिक स्पर्धा जाहीर केलेल्या मायकेल फेल्प्सने सहा सुवर्णपदके जिंकली. त्याची एकंदर पदके २३ सुवर्णपदकांसह २८ झाली. कॅटी लेदेकी हिने २००, ४००, ८०० मीटर फ्रीस्टाईलसह ४ बाय २०० मीटर रिले शर्यतीत सुवर्ण, तसेच ४ बाय १०० मीटर शर्यतीत रौप्य जिंकले. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिला तो रायन लॉश्ते. 

जलतरणातील यशाच्या आनंदाची पार्टी करून परतत असताना आपल्याला गॅस स्टेशनवर पिस्तूल दाखवून लुटण्यात आले, अशी कहाणी त्याने रचली. त्याला दहा महिन्यांकरीता बडतर्फ करण्यात आले. चार पुरस्कर्त्यांनी त्याच्याबरोबरील करार मोडले.

टोकियोत काय - कॅटी लेदेकी आणि तिचा अमेरिकन संघातील सहकारी कॅलेबे द्रेसेल हे फेल्प्सच्या अनुपस्थितीत स्पर्धेचा स्टार होण्याचा प्रयत्न करतील. ४००, ८००, १५०० मीटर फ्रीस्टाईलमधील जागतिक विक्रम करणारी लेदेकी प्रथमच ऑलिंपिकमध्ये होणारी १५०० मीटर, तसेच २०० मीटर शर्यत एकाच दिवशी जिंकण्याचा प्रयत्न करेल. ब्रिटनचा अॅडम पीएटी, हंगेरीचा क्रिस्तॉफ मिलाक हेही प्रभाव पाडतील. ल्युकेमेनियावर मात केलेल्या जपानच्या रिकाको इकी याच्याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

नवे काय - ऑलिंपिक स्पर्धा इतिहासातील पहिली ४ बाय १०० मीटर मिडले रिले स्पर्धा होईल. प्रत्येक देश विविध स्ट्रोकसाठी आपल्या खेळाडूंची निवड करेल. त्यात दोन पुरुष आणि दोन महिला बंधनकारक. महिलांची १५०० मीटर तसेच पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीचेही पदार्पण. या स्पर्धेत प्राथमिक शर्यती संध्याकाळी तर उपांत्य आणि अतिम फेरी सकाळी होईल.

जाता-जाता - पहिल्या ऑलिंपिकपासून जलतरणास स्थान असले तरी पहिल्यांदा तरण तलावातील स्पर्धा १९०८ च्या स्पर्धेत झाली. १८९६ च्या स्पर्धेच्यावेळी स्पर्धकांना बोटीने समुद्रात नेण्यात आले. त्यांनी बोटीतून उडी मारत स्पर्धा सुरू केली होती. १९०० च्या स्पर्धेत सेईनी नदीत प्रवाहाच्या दिशेने स्पर्धक पोहले होते, तर १९०४ च्या सेंट लुईस स्पर्धेत तलावात स्पर्धा झाली. सुरुवातीच्या ऑलिंपिकमध्ये पाण्याखाली पोहोण्याचीही स्पर्धा होती, तसेच अडथळा शर्यतही.


​ ​

संबंधित बातम्या