लोवलिना पदकापासून एक विजय दूर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 July 2021

भारताचे पुरुष बॉक्सर सलामीलाच शरणागती पत्करत असताना लोवलिना बोर्गोहेन हिने ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेतील पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. तिने जर्मनीच्या नादिन अॅपेत्झ हिच्याविरुद्ध प्रभावी कामगिरी करताना ३-२ असा कौल मिळविला.

टोकियो/ मुंबई - भारताचे पुरुष बॉक्सर सलामीलाच शरणागती पत्करत असताना लोवलिना बोर्गोहेन हिने ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेतील पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. तिने जर्मनीच्या नादिन अॅपेत्झ हिच्याविरुद्ध प्रभावी कामगिरी करताना ३-२ असा कौल मिळविला.

मेरीपाठोपाठ सलामीची लढत जिंकलेल्या लोवलिनाने पाच पंचांकडून २८-२९, २९-२८, ३०-२७, ३०-२७, २७-३० असा कौल मिळविला. लोवलिनास पहिल्या फेरीत बाय होता. आता तिच्यासमोर तिसऱ्या मानांकित निएन-चिन चेन (तैवान) हिचे आव्हान असेल. ही लढत जिंकल्यास लोवलिनाचे पदक निश्चित होऊ शकेल.

तीन वर्षांपूर्वीच्या दिल्लीतील स्पर्धेत लोवलिना तसेच नॉदिन यांनी ब्राँझ जिंकले होते. त्यामुळे लोवलिना प्रतिस्पर्धीचा खेळ जाणून होता. आपल्या जास्त उंचीचा फायदा घेताना लोवलिनाने ताकदवान पंच दिले, त्याच वेळी तिला नॉदिनच्या जोरदार डाव्या ठोशांना सामोरे जावे लागले. पहिल्या फेरीत लोवलिनाचे पारडे सरस असल्याने दुसऱ्या फेरीत दोनदा जागतिक ब्राँझ जिंकलेल्या नॉदिनकडून जोरदार प्रतिहल्ला अपेक्षितच होता. लोवलिनाने हे जाणून चांगला बचाव केला. त्यामुळे नॉदिनच्या आक्रमणास पुरेसे यश आले नाही.

लोवलिनाने तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीत बचाव आणि आक्रमणाचा चांगला संगम साधला आणि सुरवातीच्या दोन फेऱ्यांनंतर मिळविलेला अनुकूल कौल कायम राखला. 

लोवलिना जागतिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत निएन-चीन हिच्याविरुद्ध पराजित झाली आहे. अर्थात, ही लढत जिंकल्यास लोवलिनाचे पदक निश्चित होईल.


​ ​

संबंधित बातम्या