Tokyo Olympics 2020 : ऑलिंपिक पात्र चिंकी भारतीय संघाबाहेर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 April 2021

अंजुमला दहा मीटर एअर रायफलऐवजी ५० मीटर रायफल थ्री पोझीशनसाठी निवडण्यात आले. ऑलिंपिक क्रीडा नेमबाजी स्पर्धेच्या नियमानुसार यजमान संघटनेस एक पात्रता बदलण्याची मुभा असते.

मुंबई : भारतीय नेमबाजी संघटनेने ऑलिंपिकसाठी संघनिवड करताना पात्रता मिळवलेली पिस्तुल नेमबाज चिंकी यादव हीला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी दहा मीटरच्या एअर रायफलमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या एलावेनील वालारिवान हीची पात्रता मिळवलेली नसतानाही निवड केली. एलावेनील दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत अंजुम मौदगिलने मिळवलेली पात्रता घेईल. त्यामुळे या प्रकारातएलावेनील आणि अपूर्वी चंडेला यांच्यावर मदार असेल.

अंजुमला दहा मीटर एअर रायफलऐवजी ५० मीटर रायफल थ्री पोझीशनसाठी निवडण्यात आले. ऑलिंपिक क्रीडा नेमबाजी स्पर्धेच्या नियमानुसार यजमान संघटनेस एक पात्रता बदलण्याची मुभा असते. त्यानुसार भारतीय नेमबाजी संघटनेने २५ मीटर पिस्तुलमधील पात्रता ५० मीटर रायफल थ्री पोझीशनसाठी वापरण्याचे ठरवले. या प्रकारात यापूर्वीच तेजस्वीनी सावंतने भारतास पात्रता मिळवून दिली आहे. 

क्रिकेटच्या मैदानातील वर्ल्ड रेकॉर्ड; जे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं

एलावेनीलची दहा मीटर एअर रायफलसाठी निवड करताना ती मिश्र दुहेरीत दिव्यांशी सिंग पन्वरच्या साथीत खेळणार आहे. या गटात दीपक कुमार - अंजुम मौदगिलही स्पर्धेत असतील. भारतीय नेमबाजी संघटनेची आज संघनिवडीसाठी बैठक झाली. या पाच तास चाललेल्या बैठकीस हाय परफॉर्मन्स कोच दीपाली देशपांडे (सिनीयर रायफल), सुमा शिरुर (मुख्य मार्गदर्शिका, ज्युनियर रायफल) याही उपस्थित होत्या. संघटनेने कोरोना महामारी लक्षात घेऊन ऑलिंपिकला जाणाऱ्या पंधरा नेमबाजांसह चौदा नेमबाजांची अंतिम सराव शिबिरासाठी राखीव खेळाडू म्हणून निवड केली. हे खेळाडू संघ रवाना होईपर्यंत असतील. 

विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऑलिंपिक पात्रता मिळवलेली राही सरनोबतही या संघात आहे. स्वप्नील कुसळे (५० मीटर रायफल थ्री पोझीशन) तसेच अभिज्ञा पाटील (२५ मीटर स्पोर्टस्् पिस्तुल) यांची राखीव नेमबाज म्हणून निवड झाली.

 


​ ​

संबंधित बातम्या