आशियाई स्पर्धा विक्रमासह तेजिंदर ऑलिंपिकला पात्र

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 June 2021

तेजिंदरपाल तूर याने भारतीय ग्राप्रि अॅथलेटिक्स स्पर्धा शर्यतीत गोळाफेकीत आशियाई विक्रम करीत ऑलिंपिक पात्रतेची कामगिरी केली. दरम्यान, राष्ट्रीय विक्रम केल्यानंतरही द्युती चंद ऑलिंपिक पात्रता वेळ नोंदवण्यात अपयशी ठरली.

मुंबई - तेजिंदरपाल तूर याने भारतीय ग्राप्रि अॅथलेटिक्स स्पर्धा शर्यतीत गोळाफेकीत आशियाई विक्रम करीत ऑलिंपिक पात्रतेची कामगिरी केली. दरम्यान, राष्ट्रीय विक्रम केल्यानंतरही द्युती चंद ऑलिंपिक पात्रता वेळ नोंदवण्यात अपयशी ठरली.

तेजिंदरने पतियाळातील या स्पर्धेत २१.४९ मीटर अंतरावर गोळाफेक केली. ऑलिंपिक पात्रता कामगिरी २१.१० मीटर होती. तेजिंदरने चार दिवसांपूर्वी बहारीनच्या अब्दुल रहमान महम्मद याने नोंदवलेला २१.१५ मीटरचा विक्रम मागे टाकला, असे अॅथलेटिक्समधील सांख्यिकीतज्ज्ञ राम मुरली कृष्णन यांनी सांगितले. 

द्युती चंदने दोन शर्यतीत राष्ट्रीय विक्रम केला, पण तिला ऑलिंपिक पात्रता नोंदवता आली नाही. द्युतीने १०० मीटर शर्यतीत ११.१७ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला, पण तिला ११.१५ सेकंदाची ऑलिंपिक पात्रता वेळ नोंदवता आली नाही. द्युती, हिमा दास, धनलक्ष्मी, अरच्ना सुसींत्रान यांनी ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये ४३.३७ सेकंद कामगिरी केली, पण ऑलिंपिक पात्रता दूरच आहे. या शर्यतीत अव्वल सोळा संघ पात्र ठरतील. भारतीय संघ सध्या विसावा आहे. 

कमलप्रीत कौरने थाळीफेकीत ६५ मीटरपेक्षा जास्त अंतर पार केलेली पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला. ऑलिंपिक पात्रता यापूर्वीच साध्य केलेल्या कमलप्रीतने ६६.५९ मीटर कामगिरी नोंदवत आपली सर्वोत्तम कामगिरीही साध्य केली.


​ ​

संबंधित बातम्या