सिडनीचा यंदा दुसरा विश्वविक्रम

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 August 2021

महिलांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत दोन वर्षांपासून सिडनी मॅकलॉघलीन आणि दलीह महम्मद या दोन अमेरिकन धावपटूंतील तीव्र स्पर्धा कायम आहे. त्यात पुन्हा एकदा २१ वर्षीय सिडनीने टोकियो ऑलिंपिकमध्ये विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकताना बाजी मारली.

टोकियो - महिलांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत दोन वर्षांपासून सिडनी मॅकलॉघलीन आणि दलीह महम्मद या दोन अमेरिकन धावपटूंतील तीव्र स्पर्धा कायम आहे. त्यात पुन्हा एकदा २१ वर्षीय सिडनीने टोकियो ऑलिंपिकमध्ये विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकताना बाजी मारली. 

या सुवर्णपदकामुळे तिने दोन वर्षापूर्वी दोहा येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत दलीहकडून झालेल्या पराभवाची परतफेडही केली. सहा वर्षांपूर्वी जागतिक युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिडनीने ५१.४६ सेकंदाचा नवीन विश्वविक्रम करताना यंदा केलेला ५१.९० सेकंदाचा स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढला. शेवटपर्यंत ती आणि दलीह यांच्यात चुरस होती. मात्र, दलीहला ५१.५६ सेकंदासह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यामुळे तिला रिओत जिंकलेले सुवर्णपदक कायम ठेवता आले नाही. युरोपियन विजेती नेदरलँडची फेमके बोल ५२.०३ सेकंदात ब्राँझपदकाची मानकरी ठरली. 

तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत पुरुषांप्रमाणे महिलांतही केनियाच्या वर्चस्वाला धक्का बसला. युगांडाच्या पेरूथ चेमुताईने माजी विश्वविजेत्या केनियाच्या हायविन कियेंगला चकित केले आणि ९ मि.०१.४५ सेकंदात सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी जॉन अकी बुवाने १९७२ च्या स्पर्धेत चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत तर स्टिफन किपरोटिचने २०१२ च्या स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. 


​ ​

संबंधित बातम्या