महिला बॉक्सरची सुपर टेन कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 May 2021

मेरी कोमसह भारताच्या सर्व दहा महिला बॉक्सरनी आशियाई स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करीत पदक निश्चित केले. दरम्यान, अमित पंघलने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे भारताची या स्पर्धेतील तेरा पदके निश्चित झाली.

मुंबई - मेरी कोमसह भारताच्या सर्व दहा महिला बॉक्सरनी आशियाई स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करीत पदक निश्चित केले. दरम्यान, अमित पंघलने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे भारताची या स्पर्धेतील तेरा पदके निश्चित झाली. दुबईत सुरू असलेल्या या स्पर्धेत सहा वेळच्या जागतिक विजेत्या मेरी कोमसह (५१ किलो), सिमरनजीत (६० किलो), साक्षी (५४ किलो), जैसमिन (५७ किलो), लालबुतसाई (६४ किलो), लोविना बोर्गोहैन (६९ किलो), पूजा राणी (७५ किलो), मोनिका (४८ किलो), स्वीटी (८१ किलो), अनुपमा (८१ किलोपेक्षा जास्त) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अमितने लौकिकास साजेशी कामगिरी करताना ५२ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत खारखुन एखमांदाख याला ३-२ असे हरवले.

निर्णायक फेरीत अचूक ठोसे देत उत्तम बचाव करीत अमितने बाजी मारली. त्याने यामुळे सलग तिसऱ्या स्पर्धेत पदक निश्चित केले. त्याने २०१७ च्या स्पर्धेत ब्राँझ, तर २०१९ च्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नरिंदर (९१ किलोपेक्षा जास्त) आणि वरिंदर सिंग (६० किलो) यांनीही उपांत्य फेरी गाठली आहे. भारताने गतस्पर्धेत तेरा पदके जिंकली होती, या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी भारताने साधली आहे.


​ ​

संबंधित बातम्या