भारतापेक्षा क्रोएशियातच सराव सुरक्षित - अंजुम मोदगिल

पीटीआय
Sunday, 9 May 2021

भारतात कोरोनाचा विस्फोट सुरू असताना येथे रहाण्यापेक्षा टोकियो ऑलिंपिकपर्यंत क्रोएशियात सराव करत रहाणे कधीही सुरक्षित आहे, असे मत ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या अंजुम मोदगिल हिने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा विस्फोट सुरू असताना येथे रहाण्यापेक्षा टोकियो ऑलिंपिकपर्यंत क्रोएशियात सराव करत रहाणे कधीही सुरक्षित आहे, असे मत ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या अंजुम मोदगिल हिने व्यक्त केले आहे.

टोकियो ऑलिंपिकसाठीचा भारताचा १५ सदस्यांचा संघ झाग्रेबला ११ मे रोजी रवाना होणार आहे. येथे हे खेळाडू सराव आणि स्पर्धा खेळणार आहेत आणि तेथूनच ते २३ जुलै रोजी सुरू होणाऱ्या ऑलिंपिकसाठी टोकियोला रवाना होणार आहेत.
क्रोएशियात युरोपियन चॅम्पियन्सशिप (२० मे ते ६ जून) आणि विश्वकरंडक ( २२ जून ते ३ जुलै) होणार आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत.

भारतात सराव करण्याची आता योग्य वेळ नाही. माझ्याकडे ५० मीटर थ्री पोझिशनसाठीची स्वतःची रेंज नाही. यासाठी मला दिल्ली किंवा पुण्याला जावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत हे सुरक्षित नाही, असे मत अंजुमने क्रीडा प्राधिकरणारे आयोजित केलेल्या व्हिडियो पत्रकार परिषदेत मांडले.

सध्याची देशातील कोरोना परिस्थिती पहाता क्रोएशिया फारच सुरक्षित आहे. संघ म्हणून आम्ही येथे एकत्र असू. तसेच तीन महिने घरापासून दूर राहिलो तरी अडचण येणार नाही, अशी भावना अंजुमने व्यक्त केली. क्रोएशियात दाखल झाल्यानंतर आमचे सात दिवसांचे विलगीकरण असेल, क्रीडा प्राधिकरणाने आमच्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली आहे. हे सुद्धा जैव सुरक्षा वातावरणासारखेच असेल, असेही अंजुम म्हणाली.

टोकियो ऑलिंपिकमध्ये अंजुम ५० मीटर रायफल थ्री पोझिशन णि १० मीटर एअर रायफल मिश्र टीम प्रकारात सहभागी होणार आहे.  २०१८ मधील विश्व स्पर्धेत रौप्य पदक मिळवलेल्या १० मीटर एअर रायफलसाठी मात्र ती पात्र ठरली नाही. अंजुमने कोरोनावरील लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. अंजुमला नेमबाजीसह चित्रकलेचीही आवड आहे. भारतीय संघातील इतर नेमबाज वापत असलेल्या मास्कवर ती डिझाईन करत असते.


​ ​

संबंधित बातम्या