वाढत्या कोरोनाचा भारताच्या ऑलिपिंक मोहिमेस फटका

पीटीआय
Friday, 30 April 2021

देशातील रोज वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे भारताबरोबरील हवाई संपर्क अनेक देशांनी तोडला आहे. त्याचा फटका भारतीय संघाच्या ऑलिंपिक मोहिमेस बसत आहे. भारतीय अॅथलेटिक्स संघ जागतिक रिले स्पर्धेपासून मुकला आहे; तर हीच वेळ त्यापाठोपाठ अनेक संघांवर येणार आहे.

मुंबई/ नवी दिल्ली - देशातील रोज वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे भारताबरोबरील हवाई संपर्क अनेक देशांनी तोडला आहे. त्याचा फटका भारतीय संघाच्या ऑलिंपिक मोहिमेस बसत आहे. भारतीय अॅथलेटिक्स संघ जागतिक रिले स्पर्धेपासून मुकला आहे; तर हीच वेळ त्यापाठोपाठ अनेक संघांवर येणार आहे.

भारतातील थेट विमान सेवा बंद आहे. त्यातच पर्यायाची चाचपणी केल्यावर भारतीयांच्या ट्रान्झिटसाठीही अनेक देश तयार होत नसल्याचे क्रीडा पदाधिकारी सांगतात. त्यामुळे युरोपातील स्पर्धांसाठी जाणे अवघडच झाले आहे. त्यातच भारताच्या आघाडीच्या क्रीडापटूंना कोरोनाची लागण झाल्याने प्रश्न जास्तच गंभीर झाला आहे. भारतीय कुस्ती संघ उद्या (३० एप्रिल) किंवा शनिवारी (१ मे) एअर फ्रान्सच्या विमानाने पॅरिसला रवाना होण्याची शक्यता आहे. तेथून हा संघ सोफियातील ऑलिंपिक जागतिक पात्रता स्पर्धेस रवाना होऊ शकेल.

जागतिक रिले स्पर्धेतून माघार घेणे भारतीय अॅथलेटिक्स संघास भाग पडले आहे; तर दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नेमबाजांचे शिबिर तिथे होणे आता जवळपास अशक्य आहे. क्रोएशियात सराव शिबिर घेण्याचा प्रस्तावही बारगळण्याची शक्यता आहे.

भारतीय महिला हॉकी संघातील सात जणींना कोरोनाची लागण झाली; तर पुरुष संघाचा ब्रिटन दौरा यापूर्वीच रद्द झाला आहे. जर्मनी आणि स्पेनमध्येही भारतीय संघ कसा खेळणार हा प्रश्न आहे.

मलेशियाने भारताबरोबरची हवाई सेवा थांबवली आहे, त्यामुळे २५ ते ३० मेदरम्यान होणाऱ्या मलेशियन बॅडमिंटनमध्ये भारतीय सहभागी होणार नाहीत अशीच शक्यता आहे.

वाढती आव्हाने

  • भारतीय अॅथलेटिक्स रिले संघ जागतिक स्पर्धेसाठी रवाना होण्यात अपयशी
  • कुस्तिगिरांचा ऑलिंपिक जागतिक पात्रता स्पर्धा सहभागाबाबत प्रश्नचिन्ह- भारतीय बॅडमिंटनपटूंचा मलेशिया दौरा संकटात
  • साईना, कितांबी श्रीकांतला ऑलिंपिक पात्रतेच्या गुणांवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे
  • भारतीय हॉकी संघाची ब्रिटनविरुद्धची प्रो लीगमधील लढत लांबणीवर
  • लीगमधील जर्मनी आणि स्पेनमधील लढतीबाबतही अनिश्चितता आहे
  • बाकू विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा रद्द
  • जपानमधील आशियाई रोईंग पात्रतेसाठी संघ शुक्रवारी रवाना होणार.

​ ​

संबंधित बातम्या