मिश्र दुहेरीत रायफल आणि पिस्तूलमध्ये भारतीयांकडून पदकाची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 July 2021

भारतीय नेमबाजांना मंगळवारी दुहेरी सुवर्णवेध घेण्याची संधी आहे. भारताच्या प्रत्येकी दोन जोड्या उद्या होणाऱ्या ऑलिंपिक नेमबाजी स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत आपले कसब पणास लावतील.

मुंबई /  टोकियो - भारतीय नेमबाजांना मंगळवारी दुहेरी सुवर्णवेध घेण्याची संधी आहे. भारताच्या प्रत्येकी दोन जोड्या उद्या होणाऱ्या ऑलिंपिक नेमबाजी स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत आपले कसब पणास लावतील. दरम्यान, ट्रॅप प्रकारात भारतीय नेमबाज अंतिम फेरीपासून दूर राहिले.

मिश्र दुहेरीत खेळणाऱ्या भारताच्या चारही जोड्यांनी वैयक्तिक स्पर्धेत आपला कस पणास लावला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरील आता ऑलिंपिक स्पर्धा सहभागाचे दडपण दूर झाले असेल, अशीही अपेक्षा आहे. त्यामुळे भारताचे युवा नेमबाज एकापेक्षा जास्त पदकाचा वेध घेतील, अशी अपेक्षा आहे. भारतातील नेमबाजी अभ्यासकांना या प्रकारात पदकाची सर्वाधिक आशा आहे. मिश्र दुहेरीची स्पर्धा प्रथमच ऑलिंपिक स्पर्धेत होत आहे.

दरम्यान, ट्रॅप प्रकाराच्या स्पर्धेत अंगद बाजवा १२० गुणांसह १८ वा, तर मेईराज अहमद खान ११७ गुणांसह २५ वा आला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत १२५ गुणांसाठी स्पर्धा असते. 

मिश्र दुहेरीची स्पर्धा
१० मी. एअर पिस्तूल 
भारतीय आव्हान -
सौरभ चौधरी आणि मनू भाकर, अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंग देस्वाल
सहभाग आणि आव्हान - वीस जोड्यांचा सहभाग. रशिया, चीन, इराण, फ्रान्स, सर्बिया 
वेळ - प्राथमिक फेरी सकाळी ५.३० आणि पदकाच्या लढती सकाळी ७.३०

१० मीटर एअर रायफल भारतीय आव्हान -
दिव्यांश सिंग पवार आणि एलावेनिल वलारिवान, दीपक कुमार आणि अंजुम मौदगिल

सहभाग आणि आव्हान -
२९ जोड्यांचा सहभाग, हंगेरी, रशिया, अमेरिका, चीन, जर्मनी
वेळ - प्राथमिक फेरी सकाळी ९.४५ आणि अंतिम फेरी ११.४५

स्पर्धेचे स्वरूप

  • पहिल्या प्राथमिक फेरीत प्रत्येक स्पर्धक  दहा शॉट्‍स‍ची एक अशा तीन फैरी 
  • दुसऱ्या प्राथमिक फेरीत अव्वल आठ स्पर्धकांत चुरस, त्यात दहा शॉट्‍सची एक अशा दोन फैरी 
  • आघाडीच्या दोन जोड्यांत सुवर्णपदकासाठी, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकात ब्राँझ पदकासाठी लढत
  • पदक निश्चित करणाऱ्या फेरीत प्रत्येक स्पर्धकाचा एक शॉट. ज्या जोडीचे गुण जास्त असतील. त्यांना दोन गुण. बरोबरीसाठी एक गुण

​ ​

संबंधित बातम्या