रिले संघ ऑलिंपिकची पात्रता गाठेल - हिमा

पीटीआय
Thursday, 22 April 2021

पुढील महिन्यात पोलंड येथे जागतिक रिले स्पर्धा होणार असून यातून भारतीय महिला ४ बाय १०० मीटर रिले संघ टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरेल, असा विश्वास हिमा दासने व्यक्त केला.

नवी दिल्ली - पुढील महिन्यात पोलंड येथे जागतिक रिले स्पर्धा होणार असून यातून भारतीय महिला ४ बाय १०० मीटर रिले संघ टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरेल, असा विश्वास हिमा दासने व्यक्त केला. हिमाचा या रिले संघात समावेश आहे. १ व २ मे रोजी पोलंडमधील सेलिसिया येथे होणाऱ्या स्पर्धेतील प्रथम आठ संघ थेट ऑलिंपिकसाठी पात्र ठरतील.

हिमाचा रिले संघात समावेश असला, तरी तिला अजून वैयक्तिक प्रकारात ऑलिंपिकची पात्रता गाठता आलेली नाही. हिमाशिवाय रिले संघात द्युतीचंद, अर्चना सुसींद्रन आणि एस. धनलक्ष्मी या तीन प्रमुख धावपटूंचा समावेश आहे. हिमाश्री रॉय आणि ए. धनेश्वरी या अन्य दोघी संघात आहेत.

माझी तयारी उत्तम सुरू आहे आणि इतर धावपटूही चांगली तयारी करीत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या फेडरेशन करंडक स्पर्धेत आम्ही शंभर मीटर शर्यतीत चांगली कामगिरी केली. त्यामुळे पात्रता गाठू, असा आत्मविश्वास आहे, असे हिमा दास म्हणाली. फेडरेशन करंडक स्पर्धेत धनलक्ष्मीने सुवर्ण; तर द्युतीने रौप्य आणि सुसींद्रनने ब्राँझपदक जिंकले होते. हिमाने प्राथमिक फेरीत ११.६३ सेकंद वेळ दिली होती. अंतिम फेरीत चुकीचा प्रारंभ केल्याने तिला अपात्र ठरविण्यात आले होते. 
रिले संघ विशेष सरावासाठी तुर्कीला जाणार आहे. या दौऱ्यात मी शंभर व दोनशे मीटर शर्यतीवर लक्ष्य केंद्रित करणार आहे, असे ‘ढिंग एक्स्प्रेस'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाने सांगितले. सरावासोबत मी तुर्की आणि तुर्कीच्या जवळपास होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भाग घेणार आहे. त्यात शंभर व दोनशे मीटर शर्यतीत सहभागी होईल, असे तिने स्पष्ट केले.

चारशे मीटरचा निर्णय प्रशिक्षक घेणार
हिमाने तीन वर्षांपूर्वी फिनलँडमध्ये झालेल्या विश्व ज्युनिअर स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते आणि त्यानंतर जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बहरीनच्या सल्वा नासेरपाठोपाठ रौप्यपदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतच तिने ५०.७९  सेकंदाचा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. त्यामुळे चारशे मीटर शर्यतीत तिच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या; मात्र गेल्या दोन वर्षांपासून ती चारशे मीटर शर्यतीत सहभागी झालेली नाही. यंदा तरी हिमा चारशे मीटर शर्यतीत धावणार का, असे विचारल्यावर ती म्हणाली, याचा निर्णय प्रशिक्षक गॅलिना बुखरिना आणि एएफआय घेईल. दोन वर्षांपूर्वी दोहा येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत दुखापतीमुळे ती चारशे मीटरची शर्यत पूर्ण करू शकली नव्हती.


​ ​

संबंधित बातम्या