राहीच जगात अव्वल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 July 2021

क्रोएशियातील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे राही सरनोबतने जागतिक क्रमवारीतील २५ मीटर पिस्तूल गटात अव्वल क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्लीतील विश्वकरंडक स्पर्धेपाठोपाठ क्रोएशियात बाजी मारल्यामुळे तिने हे स्थान मिळवले आहे.

मुंबई - क्रोएशियातील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे राही सरनोबतने जागतिक क्रमवारीतील २५ मीटर पिस्तूल गटात अव्वल क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्लीतील विश्वकरंडक स्पर्धेपाठोपाठ क्रोएशियात बाजी मारल्यामुळे तिने हे स्थान मिळवले आहे.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा तीन आठवड्यांवर असताना राहीने हे स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत राहीपाठोपाठ भारताची मनू भाकर आहे. दरम्यान, राहीप्रमाणे ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर (५० मीटर रायफल थ्री पोझीशन) आणि यशस्विनी सिंग देस्वाल (१० मीटर एअर पिस्तूल) हेही अव्वल आहेत. 

राहीचे मार्गदर्शक समरेश जंग यांनी हे स्थान महत्त्वाचे असले तरी ही इतिहासातील यशाची पावती असते; मात्र सध्या आमचे लक्ष महत्त्वाच्या स्पर्धेकडे आहे असे सांगितले. आम्ही यापूर्वीच्या स्पर्धेत काय चुकले आणि ते कसे दुरुस्त करता येईल याचा विचार करतो. आताही पूर्वतयारीत यासच महत्त्व दिले आहे असे सांगितले.

मनू १० मीटर एअर पिस्तूल तसेच २५ मीटर पिस्तूल या प्रकारात दुसरी आहे. चिंकी यादव २५ मीटर पिस्तूलमध्ये चौथी आहे; तर १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अभिषेक वर्मा तिसरा आहे. दरम्यान, तेजस्विनी सावंत ५० मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये १८ व्या स्थानी आहे. 

जागतिक क्रमवारीत भारतीय
अव्वल स्थानी

  • राही सरनोबत (२५ मीटर पिस्तूल)
  • ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर (५० मीटर रायफल थ्री पोझीशन)
  • यशस्विनी सिंग देस्वाल (१० मीटर एअर पिस्तूल)
  • द्वितीय स्थानी - सौरभ चौधरी (१० मीटर एअर पिस्तूल), मनू भाकर (१० मीटर एअर पिस्तूल तसेच २५ मीटर पिस्तूल)
  • तृतीय स्थानी - अभिषेक वर्मा (१० मीटर एअर पिस्तूल)
  • चौथ्या स्थानी - चिंकी यादव (२५ मीटर पिस्तूल)
  • पाचव्या स्थानी - विजयवीर सिद्धू (२५ मी रॅपिड फायर पिस्तूल)
  • सहाव्या स्थानी - दिव्यांश सिंग पन्वर (१० मीटर एअर रायफल)
  • नवव्या स्थानी - संजीव राजपूत (५० मीटर रायफल थ्री पोझीशन), अंजुम मौदगिल (१० मीटर एअर रायफल)
  • दहाव्या स्थानी - दीपक कुमार (१० मीटर एअर रायफल), रिझवी शाझार (१० मीटर एअर पिस्तूल)

जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान नक्कीच सुखावणारे आहे. यामुळे आगामी महत्त्वाच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी माझा आत्मविश्वास उंचावण्यास नक्कीच मदत झाली आहे.
- राही सरनोबत


​ ​

संबंधित बातम्या