गोल्फमध्ये अदिती अशोकचा सुखद धक्का

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 August 2021

रिओ ऑलिंपिकमधील गोल्फ स्पर्धेस अदिती अशोक पात्र ठरली, त्या वेळी ती स्पर्धेतील सर्वांत लहान स्पर्धक होती. आता टोकियोची स्पर्धा सुरू झाली, त्या वेळी कोणीही तिचे भारताच्या संभाव्य पदकविजेत्यांत समावेश करीत नव्हते, पण आदितीने पहिल्याच दिवशी संयुक्त दुसरा क्रमांक मिळवित भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

टोकियो / मुंबई - रिओ ऑलिंपिकमधील गोल्फ स्पर्धेस अदिती अशोक पात्र ठरली, त्या वेळी ती स्पर्धेतील सर्वांत लहान स्पर्धक होती. आता टोकियोची स्पर्धा सुरू झाली, त्या वेळी कोणीही तिचे भारताच्या संभाव्य पदकविजेत्यांत समावेश करीत नव्हते, पण आदितीने पहिल्याच दिवशी संयुक्त दुसरा क्रमांक मिळवित भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

रिओत अदितीने सलग दोन फेऱ्यांत ६८ गुण मिळवित दोन फेऱ्यांत आठवा क्रमांक मिळविला होता. पाच वर्षांनंतर टोकियोत जागतिक क्रमवारीत २०० व्या स्थानी असलेली अदिती आणि आघाडीवरील स्वीडनची मॅडेलीन सॅगस्टॉर्म यांच्यात एका दोषांकाचा फरक आहे. अदिती आणि अमेरिकेच्या नील कोर्डा यांचे प्रत्येकी ६७ दोषांक आहेत; तर सॅगस्टॉर्मचे ६६. रिओत अदितीला ६६ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते, पण या वेळी तिने शांतपणे कामगिरी करीत पदकाच्या आशा निर्माण केल्या आहेत.

अनेकांना गोल्फमध्ये नेमके काय होत असते हेच माहिती नाही. त्यामुळे मी काय कामगिरी करते किंवा मला पदकाची किती संधी आहे, याबाबत अंदाज व्यक्त करणेही कठीण होते, असे अदितीने स्थानिक माध्यमांना सांगितले. अर्थात, ऑलिंपिकमधील कामगिरी अनेकांच्या लक्षात राहते. रिओ स्पर्धेनंतर मी व्यावसायिक मालिकेतील तीन स्पर्धा जिंकल्या होत्या, पण त्यानंतर ऑलिंपिकमधीलच कामगिरी माझे लक्ष्य होती असे ती म्हणाली.

रिओ स्पर्धेच्या वेळी मी खूपच नवोदित होते, पण या वेळी चांगल्या तयारीत आहे, असे अदितीने सांगितले. त्याची प्रचीती आली. पहिल्या दिवशी पहिल्या १० प्रयत्नांच्या टप्प्यात तिने दोन बर्डीज मिळविले; तर दुसऱ्या टप्प्यात तीन. अठराव्या प्रयत्नातील एका बोगीमुळे तिचे ६७ गुण आहेत, हे ७१ पैकीचे गुण आहेत. पाच वर्षे व्यावसायिक स्पर्धा खेळल्याचा फायदा आता अदितीला होत आहे.

दरम्यान, या स्पर्धेत ऐनवेळी प्रवेश मिळविलेली दीक्षा डागर ७६ दोषांकासह संयुक्त ५८ व्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत ६० खेळाडूंचा सहभाग आहे.


​ ​

संबंधित बातम्या