पॅरालिंपिक होणार अफगाणच्या खेळाडूंविना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 August 2021

अफगाणिस्तानमधील एका महिला अॅथलीटने काबूलमध्ये आपण कसे `बंदिवान` आहोत, याची व्यथा दाखवणारा व्हिडीओ मन हेलावणारा आहे.  एकूणच परिस्थिती पाहता पॅरालिंपिक स्पर्धा अफगाण खेळाडूंविना होणार आहे.

टोकियो - अफगाणिस्तानमधील एका महिला अॅथलीटने काबूलमध्ये आपण कसे `बंदिवान` आहोत, याची व्यथा दाखवणारा व्हिडीओ मन हेलावणारा आहे. एकूणच परिस्थिती पाहता पॅरालिंपिक स्पर्धा अफगाण खेळाडूंविना होणार आहे. आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षांनी तसे स्पष्ट केले. 

काबूलमधील विमानतळाची भयावह परिस्थिती आम्ही छायाचित्र आणि व्हिडीओतून पाहिली. तेथून कोणतेही विमान उड्डाण करत नाही. तेथून टोकियोसाठी अॅथलीट येणे आता अशक्यच आहे, असे आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्ष अॅण्ड्यू पर्सन्स यांनी सांगितले.

तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पॅरालिंपिक स्पर्धेत आमचे दोन खेळाडू पात्र ठरले होते. आता ते या स्पर्धेत सहभागी होणार नाही, असा संदेश अफगाणिस्तान पॅरालिंपिक संघटनेने आम्हाला पाठवला आहे. ही स्पर्धा २४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. 

तायक्वांदो खेळाडू झाकिया खुदादादी आणि ट्रॅक आणि फिल्ड धावपटू हुसैन रासून हे पॅरालिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले अफगाणिस्तानचे दोन खेळाडू टोकियोत काल दाखल होणे अपेक्षित होते.

अफगाणिस्तानची पहिली महिला अॅथलीट म्हणून पॅरालिंपिक स्पर्धेत खेळण्याची मला संधी मिळणार होती. माझे हे स्वप्न सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे भंग पावले आहे, अशी व्यथा खुदादादीने व्हिडियोद्वारे व्यक्त केली. 

खुदादादीचा हा व्हिडीओ आम्ही पाहिला. तिच्यासह आमचेही मन खिन्न झाले. आम्हीही फार दुःखी झालो, अले पर्सन्स म्हणाले. आता तरी ती पॅरालिंपिक स्पर्धेत खेळू शकणार नसली, तरी आम्ही तिचे स्वप्न २०२४ पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असेही पर्सन्स यांनी सांगितले. टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत तरी ते शक्य नाही. सध्या तरी अफगाणिस्तानमधील परिस्थिती सामन्य होणे गरजेचे आहे. महिलांना सुरक्षित राहणे गरजेचे आहे, अशी भावनाही पर्सन्स यांनी व्यक्त केली.


​ ​

संबंधित बातम्या