उद्‍घाटनाला केवळ २८ भारतीय खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी उत्सुक असलेल्या भारतीय पथकाने उद््घाटन सोहळ्यातील भारतीय खेळाडूंची संख्या मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे संचालनातील भारतीय पथकात २८ खेळाडू आणि सहा पदाधिकारीच असण्याची शक्यता आहे.

टोकियो/मुंबई - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी उत्सुक असलेल्या भारतीय पथकाने उद््घाटन सोहळ्यातील भारतीय खेळाडूंची संख्या मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे संचालनातील भारतीय पथकात २८ खेळाडू आणि सहा पदाधिकारीच असण्याची शक्यता आहे. 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील खेळांचा कार्यक्रम लक्षात घेऊन भारताने नेमबाजी, बॅडमिंटन, तिरंदाजी, तसेच टेनिस या खेळातील एकाही खेळाडूची निवड केलेली नाही. त्याचबरोबर वेटलिफ्टर मीराबाई चानू तसेच ज्यूदोका सुशीला देवी यांचाही सहभाग नसेल. त्याचबरोबर ध्वजधारक मनप्रीत सिंग सोडल्यास भारतीय पुरुष, तसेच महिला हॉकी संघातील खेळाडूही त्यात सहभागी होणार नाहीत. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पथकात एक हॉकीपटू, आठ बॉक्सर, चार टेबल टेनिस खेळाडू, दोन रोईंगपटू, एक जिम्नॅस्ट, एक जलतरणपटू, चार सेलर, फेन्सिंगमधील एक असे २८ खेळाडू असतील. त्याचबरोबर सहा पदाधिकारी असतील. 

भारताचा क्रमांक २१ वा
ऑलिंपिक स्पर्धेतील देशांच्या संचलनात भारतीय पथक २१ वे असेल. जापनीज अद्याक्षरानुसार ही क्रमवारी ठरविण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय पथक २१ वे असेल, असे बत्रा यांनी सांगितले.

भारतीय कोरोनाबाधित असल्याची चर्चा
भारतीय पथकातील तिघे कोरोनाबाधित असल्याची चर्चा सोमवारी रात्री टोकियोत सुरू झाली. मात्र यासंदर्भात भारतीय पथकाकडून तातडीने चौकशी केल्यावर स्वयंसेवकांकडून याबाबतची चूक झाली होती. त्यांनी ही चूक तातडीने दुरुस्त केली आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, ऑलिंपिक स्पर्धेस आलेल्या प्रत्येकास रोजचे आपले तापमान नोंदविण्याची सूचना आहे. ते चुकीचे नोंदले गेल्यास कोरोना नियंत्रण कक्षास संदेश जातो. मात्र भारतीयांची नोंद करताना प्रथमच काम करीत असलेल्या स्वयंसेवकांकडून चूक झाली, असे सांगितले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या