कोरोनाची धास्ती किती दिवस बाळगणार : मेरी कोम

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 23 February 2021

टोकियो ऑलिंपिकमध्ये माझ्या प्रतिस्पर्धी तरुण असतील; पण शिबिरात मी अजूनही सर्वात वेगवान असल्याचे दाखवले आहे. मी कायम सर्वोत्तम कामगिरीसाठी तयार असते. निकाल पूर्ण माझ्या हातात नसतो. खेळाचा आनंद पुरेपूर घेत आहे. प्लीज टोकियोनंतर काय हे आत्ता विचारू नका.
- मेरी कोम
 

नवी दिल्ली : कोरोनाच्या धास्तीने स्पर्धेपासून दूर राहिलेली मेरी कोम पुनरागमनाच्या स्पर्धेत अधिक जोषपूर्ण कामगिरी करण्यास उत्सुक आहे. जवळपास एका वर्षानंतर स्पर्धेत खेळणाऱ्या मेरी कोमने, किती दिवस कोरोनाची धास्ती बाळगणार, स्पर्धा सहभागाचा ब्रेक कधी तरी खंडित करावाच लागणार, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

मेरी कोमने गतवर्षी प्रामुख्याने घरीच सराव केला होता. डेंगीतून बरी झाल्यानंतर ती बंगळूरुच्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाली. आता स्पेनमधील बॉक्‍सॅम आंतरराष्ट्रीय स्पर्धेद्वारे ती पुनरागमन करीत आहे. गतवर्षी आशियाई पात्रता स्पर्धेद्वारे ऑलिंपिकची पात्रता मिळवल्यानंतर ती प्रथमच स्पर्धा खेळणार आहे. 

मला प्रवासाची धास्ती वाटत होती. आताही मी खूप काळजी घेणार आहे, तशीच काहीशी चिंताही आहे; पण किती दिवस भीती बाळगणार. हे कधी तरी थांबवावेच लागेल. कोरोनापासून प्रत्येकाने आपला बचाव करायलाच हवा. त्यासाठी मी मास्क वापरत आहे. स्वच्छतेकडे लक्ष देत आहे. मात्र मी खूप दिवस त्याची धास्ती बाळगली. कदाचित हे घडायला नको, असे मेरीने सांगितले. मेरीने यापूर्वी सरावासाठी परदेशात जाण्यास नकार दिला होता.

बॉक्‍सॅम स्पर्धा 1 मार्चपासून सुरू होईल, त्यात ऑलिंपिक पात्रता मिळवलेले भारताचे सर्व बॉक्‍सर सहभागी होणार आहेत. भारतीय संघ या आठवड्याच्या अखेरीस स्पेनला प्रयाण करणार आहे. माझे शरीर स्पर्धेसाठी तयार आहे. आपल्या सर्वांप्रमाणेच माझ्यासाठी 2020 अवघड वर्ष होते. त्यातच डेंगी झाला. सराव बंद झाल्याने वजनही खूप वाढले. मात्र बंगळूरुला आल्यावर पंधरा दिवसात मी वजन 59 वरून 52 पर्यंत कमी केले. माझी नेमकी तयारी किती आहे, याबाबत मार्गदर्शकच सांगू शकतील, असे मेरीने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या