ऑलिंपिक स्पर्धा होणारच; संयोजन समिती प्रमुखांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होणार का, हा प्रश्नच आता नाही. या स्पर्धा कशा जास्त सुरक्षित करता येतील याचाच आम्ही विचार करीत आहोत, असे ऑलिंपिक संयोजन समितीच्या प्रमुख सैको हाशिमोतो यांनी सांगितले.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होणार का, हा प्रश्नच आता नाही. या स्पर्धा कशा जास्त सुरक्षित करता येतील याचाच आम्ही विचार करीत आहोत, असे ऑलिंपिक संयोजन समितीच्या प्रमुख सैको हाशिमोतो यांनी सांगितले. 

टोकियोत आणीबाणी असली तरी आमचे पूर्ण लक्ष्य स्पर्धा संयोजनावर आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यास स्पर्धा प्रेक्षकांविना होईल, असेही त्यांनी सांगितले. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आता ५० दिवसांवर आहेत. त्यानिमित्ताने स्पर्धेच्या पदक वितरण सोहळ्याचे स्वरूप जाहीर करण्यात आले. त्यावेळी हाशिमोतो यांनी स्पर्धा संयोजनाबाबत टिप्पणी केली. 

ऑलिंपिक संयोजनास जपानवासीयांचा विरोध आहे, याकडे लक्ष वेधल्यावर ही स्पर्धा जपानवासीयांसाठी, तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी सुरक्षित आहे, याची ग्वाही देण्याची जबाबदारी आमची आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या सर्वत्र असुरक्षिततेची भावना आहे. त्याचवेळी आम्ही स्पर्धा होणार अशी ग्वाही देत आहोत. त्यातून काहींना वैफल्य येत आहे आणि त्यातूनच स्पर्धेस विरोध होत आहे, असे त्यांनी सांगितले. 

स्पर्धा कालावधीत लोकांच्या हालचाली मर्यादित ठेवण्याकडे आमचे लक्ष असेल. स्पर्धा सुरू असताना कोरोना रुग्णांत अचानक वाढ झाली तर ही स्पर्धा अखेरच्या क्षणासही प्रेक्षकांविना घेण्याची तयारी आम्हाला करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी अचानक काही महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास कसे सामोरे जाणार याचीही चर्चा करीत आहोत.

पहिले लसीकरण, मग ऑलिंपिक
टोकियोवासीयांना ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी योयोगी पार्क राखून ठेवण्यात आले होते, पण आता याच ठिकाणी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय टोकियो प्रशासनाने घेतला आहे. पहिले लसीकरण सुरू करणार, त्यानंतर ऑलिंपिकच्या थेट प्रक्षेपणाबाबत निर्णय घेणार असे, टोकियोच्या राज्यपाल युरिको कोईके यांनी सांगितले. 

ऑलिंपिकच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा यासाठी परिसरातील झाडे तोडण्यात आली. तेव्हापासून या प्रक्षेपणास विरोध होत आहे.

जगात अचानक  सर्वच ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्या परिस्थितीत कोणीही संघ जपानला पाठवणार नाही. या परिस्थितीत स्पर्धा संयोजनच शक्य होणार नाही. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेताना आम्हाला कमालीची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार सर्व काही विचार करून अंतिम निर्णय घ्यावा लागेल.
- सैको हाशिमोतो, स्पर्धा संयोजन प्रमुख.


​ ​

संबंधित बातम्या