न भूतो... ऑलिंपिकचे आजपासून रणशिंग

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 July 2021

न भूतो... अशा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे उद्या अधिकृत उद्‍घाटन होईल. महायुद्ध, राजकीय बहिष्कार यातून तगलेले, जास्त प्रतिष्ठा लाभलेले ऑलिंपिक आता कोरोनातून उभे राहण्यास तयार होत आहे. सव्वाशे वर्षांच्या आधुनिक ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्याच प्रेक्षकांविना ऑलिंपिक स्पर्धेस उद्या सुरुवात होत आहे.

टोकियो - न भूतो... अशा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे उद्या अधिकृत उद्‍घाटन होईल. महायुद्ध, राजकीय बहिष्कार यातून तगलेले, जास्त प्रतिष्ठा लाभलेले ऑलिंपिक आता कोरोनातून उभे राहण्यास तयार होत आहे. सव्वाशे वर्षांच्या आधुनिक ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्याच प्रेक्षकांविना ऑलिंपिक स्पर्धेस उद्या सुरुवात होत आहे. 

ऑलिंपिक स्पर्धा इतिहासात प्रथमच, स्पर्धा एक वर्ष लांबणीवर पडली. त्यामुळे प्रथमच विषम वर्षात स्पर्धा होईल. ऑलिंपिक स्पर्धांचा दांडगा अनुभव असलेलेही त्यामुळे ही स्पर्धा नेमकी कशी होईल, याचा अंदाज वर्तविण्यास तयार नाहीत. जगातील सर्वात मोठा क्रीडा सोहळा, असे ऑलिंपिक स्पर्धेचे वर्णन करण्यात येते, पण यावेळी कोणताही सोहळा नसेल. यापूर्वीच्या स्पर्धांप्रमाणे विजयाचा जल्लोष नसेल. जगातील विविध संस्कृतीची एकमेकांशी भेट नसेल, एक मात्र खरे या स्पर्धेची इतिहासात नोंद होणार!

शीतयुद्ध आणि बहिष्कार
१९८० तसेच १९८४ ची स्पर्धा अमेरिका आणि तत्कालीन सोविएत संघराज्यातील शीतयुद्धामुळे गाजली. १९७६ च्या स्पर्धेवर आफ्रिका देशांच्या बहिष्काराचे सावट होते, तर वर्णद्वेशी धोरणामुळे १९६४ तसेच १९६८ च्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेस प्रवेश नाकारला गेला. पहिल्या आणि जागतिक महायुद्धामुळे १९१६ तसेच १९४० आणि १९४४ च्या स्पर्धा रद्द झाल्या. त्यातील १९४० ची स्पर्धा जपानला होणार होती. १९४८ मध्ये स्पर्धा पुन्हा घ्यायचे ठरले, त्यावेळी टोकियोऐवजी लंडनला पसंती देण्यात आली. 

साधर्म्य १९२० च्या स्पर्धेचे
आता कदाचित ‘२०२०’ च्या या ऑलिंपिकची १९२० च्या अँटवर्प (बेल्जीयम) स्पर्धेबरोबर तुलना होऊ शकेल. तेव्हा जग पहिल्या महायुद्धातून सावरत होते आणि त्याचवेळी जगभरात आलेल्या तापाच्या साथीने ५ कोटी लोकांचा बळी घेतला होता. अर्थात तेव्हा ऑलिंपिकची भव्यताही जास्त नव्हती. त्यावेळी आहे त्या साधनांचा वापर करून स्पर्धा झाली होती. कोरोना महामारीमुळे गतवर्षी अँटवर्पला होणारा ऑलिंपिकचा शतक महोत्सवी सोहळाही रद्द झाला. 

विलगीकरणाच्या नियमामुळे..
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्यावेळी विलगीकरण हा शब्द सर्रास वापरला जात होता, यापूर्वी ऑलिंपिकमध्ये या शब्दाचा वापर झाला तो १९५६ च्या स्पर्धेच्यावेळी. त्यावेळी ऑस्ट्रेलियात प्राण्यांच्या विलगीकरणाचे नियम खूपच कठोर होते.

न झालेले ऑलिंपिक
१९०६ ची ठरलेली अथेन्स ऑलिंपिक स्पर्धा प्रश्नांची चर्चा होत असताना विसरता येणार नाही. दर चार वर्षांनी स्पर्धा होत असूनही त्यावर्षी अथेन्स आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धा झाल्या. त्यास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मान्यताही दिली होती, पण अखेर १९४९ मध्ये ही स्पर्धा अनधिकृत ठरविण्यात आल्या. 

या स्पर्धाही चर्चेतील
१९०८ ची स्पर्धा रोमला होणार होती, पण ज्वालामुखी उद्रेकामुळे स्पर्धा लंडनला झाली. त्यावेळी इटलीने ऑलिंपिकऐवजी नेपल्स शहराच्या उभारणीवर खर्च केला.
१९३६ चे बर्लिन ऑलिंपिक नाझी राजवटीच्या छायेत झाले. ज्यू असल्यामुळे अमेरिकेचे दोन खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत, त्यामुळे जेसी ओवेन्सने चार सुवर्णपदके जिंकली.


​ ​

संबंधित बातम्या