ऑलिंपिक नेमबाजीतील खराब कामगिरीची समीक्षा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 August 2021

टोकियो ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत भारताला सपशेल अपयश आले. त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून उच्च श्रेणीतील व्यक्तीकडून कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल.

नवी दिल्ली - टोकियो ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत भारताला सपशेल अपयश आले. त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून उच्च श्रेणीतील व्यक्तीकडून कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल.

या प्रकरणी भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या (एनआरएआय) अधिकाऱ्यांचीही समीक्षा होईल. टोकियो ऑलिंपिकमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर नेमबाजांच्या त्रिस्तरीय पुनरावलोकनाचा हा एक भाग आहे. ही प्रक्रिया पूर्वीच सुरू झालेली आहे. एनआरएआयच्या सूत्राने ही माहिती दिली. सलग दुसऱ्यांदा भारतीय नेमबाज ऑलिंपिकमधून रिक्त हस्ते परतले आहेत. भारताचा नेमबाजीतील १५ सदस्यीय संघ ऑलिंपिक अपेक्षांखाली दबला गेला. 

समीक्षा प्रक्रिया अगोदरच सुरू झालेली आहे आणि ती तीन भागात असेल. पहिल्यांदा खेळाडू, नंतर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ, त्यानंतर राष्ट्रीय महासंघाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्राने दिली. एनआरएआयचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांचेही मूल्यांकन होईल का या प्रश्नावर, सूत्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि महासंघाचे प्रमुख स्वतः या कल्पनेस राजी आहेत व त्यांनी यासंदर्भात टोकियोतील स्पर्धेच्या वेळेस वक्तव्य केले असल्याचे सूत्राने सांगितले. 

महासंघाच्या अधिकाऱ्यांचे मूल्यांकन योग्य व्यक्ती करेल. ऑलिंपिक तयारीसंदर्भात महासंघ कुठे कमी पडले या बाबींवर संबंधित योग्य व्यक्ती लक्ष देईल. त्यामुळे पुनरावलोकनात महासंघालाही वेगळे ठेवण्यात येणार नाही, असे सूत्राने स्पष्ट केले.

आमूलाग्र बदल अपेक्षित
महासंघाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे मूल्यांकन होण्यापूर्वी, एनआरएआ स्वतः पुनरावलोकन करणार आहे. यामध्ये नेमबाज प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांचा समावेश असेल. जपानच्या राजधानीतील आपत्तीजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महासंघ रचनेत आमूलाग्र बदल करण्याचा हेतू बाळगून आहे. 

अपयशास वादाची किनार
टोकियोतील भारतीय नेमबाजांच्या मोहिमेस वादाची किनारही लाभली. युवा पिस्तूल नेमबाज मनू भाकर आणि तिचे माजी प्रशिक्षक जसपाल राणा यांच्यातील दीर्घकालीन वादावर प्रकाशझोत राहिला, त्यामुळे गरजेशिवाय संघाच्या मनोबलावर परिणाम झाला. स्पर्धेपूर्वी आणि नंतर ज्याप्रकारे गोष्टी घडल्या, त्यावरून महासंघातील प्रत्येकजण रागावलेला आहे. खुद्द अध्यक्षही नाराज आहेत. हे चुकीचे होते आणि या सर्व बाबींचे मूल्यांकन होईल, असेही सूत्राने सांगितले. टोकियोत अपेक्षापूर्तीस अपयश आल्यानंतर रनिंदर यांनी स्पर्धेनंतर कामगिरीचे पोस्टमार्टम करण्याचे आश्वासन दिले होते.


​ ​

संबंधित बातम्या