जपानमध्ये ऑलिंपिकविरोध तीव्र

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 May 2021

ऑलिंपिकविरोधात जपानमध्ये जोरदार वातावरण तयार होत आहे. जगाच्या तुलनेत जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. त्यामुळे ऑलिंपिक रद्द होण्याची मागणी होईलच कशी.

टोकियो - ऑलिंपिकविरोधात जपानमध्ये जोरदार वातावरण तयार होत आहे. जगाच्या तुलनेत जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. त्यामुळे ऑलिंपिक रद्द होण्याची मागणी होईलच कशी. या ट्विटमुळे जपानमध्ये संतापाची लाट उसळली आहे, हे ट्विट पंतप्रधानांच्या सल्लागारांनी केल्यामुळे यावरून जास्तच वाद सुरू झाला आहे. 

काएत्सू विद्यापीठातील प्राध्यापक योईची ताकाहाशी यांनी केलेले हे ट्विट आत्तापर्यंत तेरा हजार जणांनी रीट्विट केले आहे आणि त्याच्यावरील आपली टीकाही व्यक्त केली आहे. एकाने सरकारचे माजी सल्लागार ऑलिंपिक संयोजनासाठी लोकांच्या मरणाचे कसे समर्थन करू शकतात, ही विचारणा केली आहे. 

जपानमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत दहा हजार जणांचे निधन झाले आहे. ही संख्या जगातील अनेक देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे; पण जपान लसीकरणात खूपच मागे आहे आणि काही आठवड्यांपासून रुग्णवाढ वेगाने होत आहे. 

ताकाहाशी हे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचे निकटवर्तीय समजले जातात. काहींच्या मते ते खासगी सल्लागार आहेत. ताकाहाशी यांनी आठवड्यापूर्वी सुगा यांची भेट घेतली होती, याकडे जपानमधील माध्यमांनी लक्ष वेधले आहे. ताकाहाशी यांच्या वैयक्तिक टिप्पणीवर आपण काहीही भाष्य करणार नाही, असे सुगा यांनी सांगितले. ऑलिंपिकबाबत आग्रह असल्यामुळे सुगा सरकारची लोकप्रियता सातत्याने कमी होत आहे. आयएनएनच्या सर्वेक्षणात सुगा सरकारला ४० टक्के पसंती मिळाली. याच सर्वेक्षणात ७० टक्के लोकांनी सध्या ऑलिंपिक नको, हीच भूमिका घेतली आहे. 

खेळाडूंवर माघारीसाठी दबाव
जपानच्या आघाडीच्या खेळाडूंवर ऑलिंपिक माघारीसाठी समाजमाध्यमातून दबाव येत आहे. कोरोनामुळे अनेकांवर आपत्ती ओढवली आहे; पण त्यामुळे आमच्यावर स्पर्धा असहभागासाठी दडपण आणणे चुकीचे आहे. स्पर्धा झाल्यास चाहत्यांनी आम्हाला प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा जपानची जलतरणपपटू इकेना इकी हिने व्यक्त केली. अॅथलीट किरयू योशहिदे याने याबाबत टिप्पणी करणे टाळले असल्याचे वृत्त जपानमधील एनएचके वर्ल्डने दिले आहे.


​ ​

संबंधित बातम्या