ऑलिंपिक उद्‍घाटन सोहळा व्हीआयपींसाठीच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यास केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती अर्थात व्हीआयपी तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. उद्‍घाटन सोहळ्यास चाहत्यांना प्रवेश दिल्यास त्यामुळे कोरोनाचा प्रसार होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यास केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती अर्थात व्हीआयपी तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. उद्‍घाटन सोहळ्यास चाहत्यांना प्रवेश दिल्यास त्यामुळे कोरोनाचा प्रसार होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्याद्वारे आपली ताकद दाखवण्याची जपानची योजना आहे. ऑलिंपिकद्वारे परदेशी पर्यटकांना तसेच उद्योगपतींना आकर्षित करण्याची योजना होती. आता त्यांनाच स्पर्धा कालावधीत प्रतिबंध आहे. त्यातच आता उद्‍घाटन सोहळा प्रेक्षकांविना घेण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.

उद्‍घाटन सोहळा व्हीआयपींसाठी मर्यादित ठेवला तरी त्यात कपात कशी करता येईल याचा विचार होत आहे. त्यामुळे पुरस्कर्त्यांचे पाहुणे तसेच दूतावासातील आधिकाऱ्यांत कपात होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच रात्री ९ नंतर संपणाऱ्या स्पर्धा प्रेक्षकांविना घेण्याचे ठरले आहे.

ऑलिंपिकमुळे जपानमध्ये नव्या कोरोनाची साथ पसरणार अशी अनेकांना धास्ती वाटत आहे. त्यामुळे किती चाहते स्पर्धेस येण्यास तयार होतील हाही प्रश्न आहे. स्पर्धेच्या वेळी असलेल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत अंतिम निर्णय गुरुवारी होऊ शकेल.

जपानमध्ये सध्या आणीबाणीसदृश निर्बंध आहेत. त्यात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी अपेक्षित आहे. हे निर्बंध थेट एका महिन्यासाठी करून ऑलिंपिकमधील प्रेक्षकांना प्रतिबंध करण्यात येईल. 

ऑलिंपिक ज्योतीचा प्रवासही बंदिस्त
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेची ज्योत शुक्रवारी जपानमध्ये येणार आहे, पण तिचा जपानच्या राजधानीतील प्रवास प्रेक्षकांविनाच होईल असे दिसत आहे. त्यातच आता खुल्या रस्त्यावर होणाऱ्या मॅरेथॉन तसेच चालण्याच्या स्पर्धा शर्यतीस चाहत्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन केले आहे. 

उद्‍घाटन सोहळा होणारे स्टेडियम म्हणे सुरक्षित...
स्टेडियममधील प्रेक्षकांनी एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवले, वाऱ्याचा झोत प्रेक्षकांकडून मैदानाकडे गेला आणि प्रत्येकाने मास्क परिधान केला असेल, तर या स्टेडियममुळे कोरोनाचा फैलाव होत नाही, असा दावा जपानमधील काही अभ्यासकांनी केला आहे. 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचा उद्‍घाटन तसेच समारोप सोहळा नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या वेळी उपस्थित असलेल्या दहा हजारपैकी दहा जण बाधित असले, तरी त्यांच्यामुळे या स्टेडियमवर तरी कोरोनाचा प्रसार होणार नाही. नॅशनल स्टेडियमची रचना पाहिल्यास वाऱ्याची दिशा प्रेक्षकांच्या पाठीमागून मैदानाच्या दिशेने जाणार आहे. तेथील बसण्याची व्यवस्थाही बंदिस्त स्टेडियमप्रमाणे आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी मास्क परिधान केला असेल, प्रत्येक प्रेक्षकाच्या उजवी तसेच डावीकडील, पुढची आणि मागची सीट रिकामी असेल, तर या परिस्थितीत नव्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता राहणार नाही, असे या तज्ज्ञांचे मत आहे.


​ ​

संबंधित बातम्या