Olympic Games : उत्तर कोरियाची स्पर्धेतून माघार; दक्षिण कोरियाला निर्णय खटकला

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 6 April 2021

जागतिक मानाच्या स्पर्धेत दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास मदत झाली असती, अशी प्रतिक्रिया दक्षिण कोरियाच्या मंत्रालयातून उमटली आहे.  

सेऊल : कोरोनाच्या संकटामुळे उत्तर कोरियाने ऑलिम्पिक गेम्ससंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली असून एकही खेळाडू स्पर्धेत भाग घेणार नाही. उत्तर कोरियातील क्रिडा मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार 25 मार्चला राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठकीत हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलाय. 

राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत सदस्यांनी खेळाडूंच्या सुरक्षेच्या मुद्यावर अधिक भर दिला. कोरोनाच्या संकटात खेळाडूंची आरोग्याचा प्राधान्याने विचार व्हायला हवे, यावर एकमत करुन स्पर्धेतून माघार घेण्याच्या निर्णायावर शिक्कामोर्तब करण्यात आला. उत्तर कोरियाने घेतलेल्या या निर्णयावर दक्षिण कोरियातून नाराजीचा सूर उमटलाय. जागतिक मानाच्या स्पर्धेत दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास मदत झाली असती, अशी प्रतिक्रिया दक्षिण कोरियाच्या मंत्रालयातून उमटली आहे.  

राहुल द्रविडमुळं टी-20 क्रिकेटसंदर्भातील भीती पळाली : पुजारा

जपानचे ऑलिम्पिक मंत्री तामायो मारूकावा यांनी उत्तर कोरियाच्या भूमिकेवर सावध पवित्रा घेतलाय. या वृत्ताची अद्याप पुष्टी झाली नसून सध्याच्या घडीला यावर बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.  तामायो मारकावा म्हणाले की, उत्तर कोरियाने स्पर्धेत सहभागी होणार की माघार घेणार यासंदर्भात अद्याप ऑलिम्पिक समितीला  कणतीही सूचना दिलेली नाही, असे ते म्हणाले.  

उत्तर कोरियाने 2018 मध्ये दक्षिण कोरियातील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 22 खेळाडूंना पाठवले होते. याच्याशिवाय सरकारी अधिकारी, कलाकार, पत्रकार यांच्यासह महिलांच्या ‘चीयरिंग ग्रुप'मध्ये 230 सदस्यांचा समावेश होता. यावेळी  उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया याने कोरियाती ऐक्य दाखवण्यासाठी एकत्र मार्च केला होता.  


​ ​

संबंधित बातम्या