ऑलिंपिक हॉकीपटूंचा ओडिशाकडून सन्मान

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 August 2021

ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या ओडिशातील पुरुष व महिला हॉकी संघातील खेळाडूंचा पटनाईक सरकारकडून सत्कार करण्यात आला.

भुवनेश्वर - ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या ओडिशातील पुरुष व महिला हॉकी संघातील खेळाडूंचा पटनाईक सरकारकडून सत्कार करण्यात आला. 

कलिंगा स्टेडियममध्ये पार पडलेल्या खास समारंभात बीरेंद्र लाक्रा, अमित रोहिदास, दीप ग्रेस इक्कासह नमिता तप्पो या ऑलिंपिक हॉकी संघात सामावेश असलेल्या खेळाडूंचा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला. 

ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझ पदक पटकाविणाऱ्या पुरुष हॉकी संघातील लक्रा व रोहिदास यांना ओडिशा सरकारकडून प्रत्येकी अडीच कोटींचे बक्षीस व ओडिशा पोलिस खात्यात उपअधीक्षक पदाची नोकरी या वेळी बहाल करण्यात आली; तर महिला हॉकी संघातील इक्का व तप्पो यांना प्रत्येकी ५० लाखांचे बक्षीसही देण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री पटनाईक यांनी खेळाडूंना भविष्यासाठी शुभेच्छा व आगामी काळात अशाच पाठिंब्याची हमीही दिली. तसेच सर्व खेळाडूंकडून सरकारचे आभारही मानण्यात आले. तसेच इक्का व लक्रा यांच्याकडून संघातील सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असणारी जर्सी पटनाईक यांना भेट देण्यात आली. 

ओडिशाचे क्रीडामंत्री तुषारक्रांती बेहरा व ओडिशा हॉकी संघटनेचे प्रमुख दिलीप तिर्की हेही या वेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा हे या वेळी मुख्यमंत्री पटनाईक यांचे आभार मानताना म्हणाले, की ‘सर्व लोक फक्त क्रिकेटच्या मागे चाललेले असताना, पटनाईक यांनी दोन्ही संघांचे प्रायोजकत्व स्वीकारून व पाठिंबा देऊन हॉकी या आपल्या राष्ट्रीय खेळाला नवसंजीवनी दिली आहे.’


​ ​

संबंधित बातम्या