ऑलिंपिकमध्ये येणाऱ्या पंचांची संख्या निम्म्यापेक्षा कमी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 May 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सुमारे दहा आठवड्यांवर आलेली असताना संयोजकांनी जपानमध्ये येणाऱ्यांची संख्या कशी कमी करता येईल याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सुमारे दहा आठवड्यांवर आलेली असताना संयोजकांनी जपानमध्ये येणाऱ्यांची संख्या कशी कमी करता येईल याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध खेळांसाठी परदेशातून येणाऱ्या पंच, रेफरी तसेच सामनाधिकाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचे ठरवले आहे. 

ऑलिंपिक तसेच पॅराऑलिंपिकसाठी एकत्रितपणे १ लाख ८० हजार सामना अधिकारी, पंच, रेफरी येतील. ती संख्या निम्म्यापेक्षा कमी कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ही संख्या ९० हजारपेक्षा जास्त नको, हा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. या स्पर्धेत १५ हजार क्रीडापटूंचा सहभाग असेल. त्यात कोणतीही घट करण्याचा प्रस्तावही विचारात नाही, पण कोरोनाची तीव्रता वाढल्यास सामनाधिकारी, पंच कमी करण्याचे ठरले आहे. 

संयोजकांनी यापूर्वीच विविध राष्ट्रीय ऑलिंपिक समिती तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांसह चर्चा सुरू केली आहे. सामनाधिकारी किती कमी करता येऊ शकतील याची चर्चा सुरू झाली आहे. खेळात कोणतेही वाद न होता हे कसे साध्य करता येईल याकडे लक्ष देण्यात येत आहे. 

महामारी असताना जेवढ्या कमी व्यक्ती स्पर्धेसाठी येतील, तेवढा स्पर्धेवरील ताण कमी होईल. स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षित प्रवासाचा, निवासाचा प्रश्न संयोजकांसमोर आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने यापूर्वीच परदेशातील पंच, रेफरी, सामनाधिकाऱ्यांनी संख्या ६० टक्क्यांनी कमी केली आहे. यापूर्वीच संयोजकांनी परदेशातील येणाऱ्या चाहत्यांना मनाई केली आहे. त्यामुळे खेळाडूंचे वैयक्तिक मार्गदर्शक स्पर्धेच्यावेळी नसतील.  

स्पर्धेविरोधात साडेतीन लाख जणांची याचिका

  • टोकियो ऑलिंपिक रद्द करण्यासाठी साडे तीन लाख लोकांची स्वाक्षरी असलेली याचिका संयोजकांना, तसेच टोकियोच्या राज्यपालांना देण्यात आली. टोकियोतील कोरोना रुग्णांची संख्या जपानमध्ये सर्वाधिक आहे. अन्य प्रांतापेक्षा टोकियोतील रुग्ण दुपटीने आहेत. एवढेच नव्हे तर जपानमधील कोरोनाच्या एकंदर रुग्णांपैकी जवळपास पंधरा टक्के रुग्ण टोकियोत आहेत. 
  • टोकियो व परिसरात आणीबाणी आहे. आता त्याची व्याप्ती वाढली आहे. ऑलिंपिकमधील मॅरेथॉन होणाऱ्या उत्तर हाकैदी येथेही आणीबाणी आहे. कोरोनाची चौथी लाट जपानमध्ये लवकरच येईल, त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. 
  • ऑलिंपिक विरोधकांनी स्पर्धा घेतल्यास आरोग्य तसेच अन्य यंत्रणेवर ताण पडेल, असेही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीस पाठवलेल्या याचिकेत म्हटले आहे. 

ज्यांच्याविना स्पर्धेचे आयोजन अशक्यच आहे, एवढ्याच व्यक्तींनी स्पर्धेसाठी येणे योग्य होईल. हे साध्य केल्यास स्पर्धेसाठी परदेशातून येणारे सामनाधिकारी, पंच, रेफरी हे खूपच कमी असू शकतील. 
- तोशिरा मुतो, संयोजन समिती सीईओ.  

डॉक्टर संघटनेचा विरोध
जपानमधील डॉक्टरांच्या संघटनेने स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन आरोग्यमंत्रालय तसेच पंतप्रधानांना दिले आहे. स्पर्धा झाल्यास कोरोनाचा प्रसार वेगाने होईल, असे त्यांनी म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या