ऑलिंपिकमध्ये अतिरिक्त निर्बंध नाही; भारतीय उप पथकप्रमुखांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 July 2021

भारतात डेल्टाची साथ मोठ्या प्रमाणावर असल्याचा परदेशातील अनेक माध्यमांचा दावा आहे, त्यामुळे जपाननेही भारतातून येणाऱ्या खेळाडूंवर कडक निर्बंध घातले असल्याचे सांगितले जात होते.

नवी दिल्ली - भारतात डेल्टाची साथ मोठ्या प्रमाणावर असल्याचा परदेशातील अनेक माध्यमांचा दावा आहे, त्यामुळे जपाननेही भारतातून येणाऱ्या खेळाडूंवर कडक निर्बंध घातले असल्याचे सांगितले जात होते, पण ऑलिंपिक क्रीडानगरीत मुक्कामास असलेल्या खेळाडूंना पहिल्या दिवसापासून क्रीडानगरीत मुक्तपणे फिरण्यास परवानगी देण्यात आली.

ऑलिंपिक स्पर्धेसाठी असलेल्या सुविधा जागतिक दर्जाच्या आहेत. भारतीय खेळाडूंनी स्वयंशिस्तीचे पालन करावे तसेच नियमितपणे चाचणी द्यावी ही संयोजकांची अपेक्षा आहे, असे भारतीय संघाचे उप पथकप्रमुख डॉ. प्रेम वर्मा यांनी सांगितले. आम्ही सर्व पदाधिकारी १४ जुलै रोजी टोकियोत आलो होतो. आम्हाला तीन दिवसांत विलगीकरणात राहण्याची सूचना कोणीही दिली नाही अथवा सर्वांसाठी असलेल्या भागात प्रवेश न करण्याची मनाईही करण्यात आली नाही.

भारतीय संघाचा मुक्काम टॉवर क्रमांक १५ मध्ये आहे. त्यातील ११, १२ आणि १३ वा मजला भारतीयांसाठी आरक्षित आहे. या तीन मजल्यांवर मिळून १८२ खोल्या आहेत. याच १५ क्रमांकाच्या टॉवरमध्ये दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, बेल्जियम तसेच डेन्मार्कच्या पथकाचा मुक्काम आहे.

तिरंदाजी संघ थेट कुरोबे सिटी येथे दाखल झाला आहे. त्यांचे कुरोबे सपोर्टस इंडियन अॅथलीटस्, चीअर फॉर इंडिया या फलकाने स्वागत झाले. भारताची एकमेव वेटलिफ्टर मीराबाई चानू कोरियात यापूर्वीच दाखल झाली आहे. भारतीय बॉक्सर इटलीतून; तर नेमबाज क्रोएशियातून आले आहेत.

८८ सदस्य दाखल
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा ८८ सदस्यांचा पहिला मोठा जथ्था टोकियोत दाखल झाला आहे. तिरंदाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, ज्यूदो, जिम्नॅस्टिक्स, जलतरण, वेटलिफ्टिंग या खेळांतील खेळाडू नवी दिल्लीहून टोकियोत दाखल झाले आहेत. पहिल्या पथकात ५४ खेळाडू आहेत. दाखल झालेल्या पथकातील सर्वाधिक खेळाडू हॉकीचे आहेत. या सर्व खेळाडूंना शनिवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी निरोप दिला. भारतीय खेळाडूंच्या प्रयाणाच्या वेळी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेड कार्पेट होते.


​ ​

संबंधित बातम्या