पदकांचे दडपण घेऊ नका, सर्वोत्तम खेळ करा! नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 July 2021

पदक जिंकण्याच्या दडपणाचे ओझे घेऊ नका, तुमचा सर्वोत्तम खेळ करा, असा सल्ला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिंपिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली - पदक जिंकण्याच्या दडपणाचे ओझे घेऊ नका, तुमचा सर्वोत्तम खेळ करा, असा सल्ला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिंपिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. एक नवी उंची गाठताना तुम्ही देशाची प्रतिष्ठाही उंचावाल, अशी मला खात्री आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

ऑलिंपिकला रवाना होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी आज पंतप्रधानांनी संवाद साधला. सर्व खेळाडूंचे मनोधैर्य उंचावताना त्यांना शुभेच्छाही दिल्या. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात विश्वविक्रमी बॉक्सर, मेरी कोम, ऑलिंपिक पदकविजेती आणि विश्वविजेती पी. व्ही. सिंधू, नेमबाज सौरभ चौधरी, इलावेनी वालरियन, टेबल टेनिस खेळाडू शरथ कमाल यांच्यासह इतर खेळाडूंचाही यात समावेश होता. 

पंतप्रधानांचा हा संवाद एकतर्फी नव्हता, त्यांनी खेळाडूंनाही बोलते केले. रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी तू स्वतःच्या आइस्क्रीम खाण्यावर बंदी घातली होतीस. आता टोकियोसाठी अशी कोणती बंधने आहेत काय? असा प्रश्न मोदी यांनी सिंधूला केला. यावर सिंधूने, सर, मी नेहमीच आहारासंदर्भात काटेकोर असते, असे उत्तर दिले. रिओ स्पर्धेत सिंधूने रौप्यपदक जिंकले होते.

मोदी यांनी ॲथलेटिक्स संघाचेही कौतूक केले. तुम्ही न्यू इंडियाचे प्रतिनिधीत्व करत आहात. तुमच्यात चांगला आत्मविश्वास दिसून येत आहे, असे सांगून मोदी म्हणाले, टार्गेट ऑलिंपिक स्किम या उपक्रमातून सरकारकडून तुम्हाला अधिक मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला व्यक्तीशः भेटायला मला फारच आवडेल, असा प्रसंग लवकरच येईल. तुम्ही यशस्वी होऊन मायदेशी परताल, तेव्हा मी तुमच्यासाठी निश्चितच वेळ देईन, असे मोदी म्हणाले.

तुम्हा सर्वांच्यात मला काही गोष्टी समान वाटत आहेत. निडरपणा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता यांच्यासह शिस्तब्धपणा, झोकून देण्याची वृत्ती आणि एकाग्रता हे गुण तुम्हा खेळाडूंमध्ये दिसून येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

तुझा सर्वात आवडता खेळाडू कोण आणि कोणता फटका तुला जास्त अावडतो, असा प्रश्न पंतप्रधानांनी सहा वेळा विश्वविजेतेपद आणि ऑलिंपिक ब्राँझपदक मिळवणाऱ्या मेरी कोमला केला. यावर तिने महम्मद अली आणि हुकचा फटका, असे उत्तर दिले.

तिरंदाज दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांच्या बोलतांना पंतप्रधान म्हणाले, देशवासींकडून असलेल्या अपेक्षांचे कोणतेही दडपण घेऊ नका. निर्धास्त होऊन ऑलिंपिकमध्ये खेळा. पॅरिसमधील विश्वकरंडक स्पर्धेत एकाच दिवशी मिळवलेल्या तीन सुवर्णपदकांबद्दल मोदी यांनी दीपिकाचे अभिनंदन केले. तू आत्ता जगात अव्वल मानांकित खेळाडू आहेस. बांबूच्या तीरकमट्याने तू सुरुवात केली आणि आता या यशापर्यंत आली आहेस, हा तुझा प्रवास थक्क करणारा आहे, असेही मोदी म्हणाले.

अख्खा देश तुम्हाला प्रोत्साहन देत आहे, याचा फार आनंद होत आहे. मीसुद्धा तुम्हाला शुभेच्छा देत आहे. सर्व देशवासींच्या भावना तुमच्या पाठीमागे आहेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


​ ​

संबंधित बातम्या