माझे ऑलिंपिक, माझी जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 May 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या वेळी आपल्याला कोरोना तसेच उष्णतेच्या लाटेमुळे काही झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे आपलीच असेल, याची लेखी कबुली ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना द्यावी लागणार आहे.

पॅरिस - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या वेळी आपल्याला कोरोना तसेच उष्णतेच्या लाटेमुळे काही झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे आपलीच असेल, याची लेखी कबुली ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना द्यावी लागणार आहे आणि त्यामुळे सहभागी देश आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीत सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. 

ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर त्याच्या जीविताची पूर्ण जबाबदारी टाकताना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती तसेच जपान संयोजन समितीने ही जबाबदारी नाकारली आहे. यास आता जागतिक खेळाडू संघटनेने जोरदार आक्षेप घेतला आहे. यापूर्वीच्या स्पर्धेच्या वेळी या स्वरूपाचे स्वयंघोषणापत्र असे; पण त्यात महामारी अथवा उष्णतेचा कोणताही उल्लेख नव्हता, याकडे लक्ष वेधले जात आहे. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे पदाधिकारी हे घोषणापत्र केवळ खेळाडूंसाठी नसून स्पर्धेसाठी जाणाऱ्या प्रत्येकासाठी असल्याचे सांगतात. प्रत्येक प्रमुख स्पर्धेच्या वेळी हे करण्यात येते; तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या नियमानुसार आहे, असे सांगितले जात आहे. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रमुख थॉमस बॅश स्पर्धा सुरक्षित असल्याचे सांगत आहेत, पण त्याच वेळी आता खेळाडूंच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाची रोज चाचणी होईल, असेही सांगण्यात येत आहे. स्पर्धेसाठी जपानला रवाना होण्यापूर्वी चार दिवसांत दोनदा चाचणी करण्यास सांगितले आहे.

संयोजकांनी खेळाडूंना त्यांच्या स्पर्धेपूर्वी पाचच दिवस अगोदर जपानमध्ये येण्यास परवानगी आहे; तसेच स्पर्धेतील आव्हान संपल्यावर दोन दिवसांत जपान सोडण्यास सांगितले आहे.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या वेळी असलेल्या धोक्याची मला जाणीव आहे; तसेच सर्वांसाठी मीच जबाबदार असेन. स्पर्धेत सहभागी होताना मला मोठी दुखापत झाल्यास, कोरोना तसेच महामारीची गंभीर लागण झाली, कमालीच्या उष्णतेमुळे काही विपरीत घडले, तर त्यासाठी मी पूर्णपणे जबाबदार असेन.
- ऑलिंपिक क्रीडापटूंसाठी असलेले स्वयंघोषणापत्र


​ ​

संबंधित बातम्या