मेरी कोमचा पहिल्या फेरीत नियोजनबद्ध विजय 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 July 2021

सहा वेळची विश्वविजेती, ऑलिंपिक ब्राँझपदक विजेती मेरी कोमने टोकियो ऑलिंपिकमध्येही शानदार सुरुवात केली. मेगुलिना हेर्नांडेस ग्रासियाचा ४-१ असा पराभव केला. पुरुषांमध्ये ६३ किलो गटात मनिश कौशिकला कडव्या लढतीनंतर पराभवाचा सामना करावा लागला.

टोकियो - सहा वेळची विश्वविजेती, ऑलिंपिक ब्राँझपदक विजेती मेरी कोमने टोकियो ऑलिंपिकमध्येही शानदार सुरुवात केली. मेगुलिना हेर्नांडेस ग्रासियाचा ४-१ असा पराभव केला. पुरुषांमध्ये ६३ किलो गटात मनिश कौशिकला कडव्या लढतीनंतर पराभवाचा सामना करावा लागला.

३८ वर्षीय मेरीकडे मोठा अनुभव आहे. २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेची ती ब्राँझविजेतीही आहे. आजच्या सलामीच्या लढतीत तिची प्रतिस्पर्धी १५ वर्षांनी लहान होती; परंतु मेरीने तिला गृहीत धरले नाही. ग्रासिया पॅन अमेरिकन स्पर्धेची ब्राँझपदक विजेती असल्यामुळे मेरी सावध होती. ग्रासियाच्या खेळानुसार मेरीने आपला पवित्रा ऐनवेळी बदलत नेला आणि त्याला शानदार विजयाचा मुलामा दिला.

प्रदीर्घ कालावधीनंतर मेरी रिंगणात उतरली होती. मेरीपेक्षा तरुण असलेली ग्रासिया सुरवातीपासून चपळता दाखवित होती; पण मेरीने त्या वेळी बचावावरच भर दिला. पहिल्या राऊंडमध्ये ग्रासियाला दमवले. दुसऱ्या राऊंडमघ्ये मेरीने एकापाठोपाठ एक ठोसे मारत ग्रासियाला बचावाची संधी दिली नाही. मेरीच्या या आक्रमणामुळे निष्प्रभ झालेली ग्रासिया नंतर दमली होतीच; त्यामुळे तिचा भर बचावावर होता. तिसऱ्या राऊंडमध्ये आपले वर्चस्व राहील, असाच खेळ मेरीने केला. हा सामना ठोशांपेक्षा मेरीच्या विचारपूर्वक खेळाने गाजला.

कोरोनामुळे वर्षापेक्षा अधिक काळ आपल्या सर्वांसाठीच वेदनादायी राहिला आहे. लॉकडाऊन असल्याने खेळाडूंना सराव करता येत नव्हता. आम्हा बॉक्सर्ससाठी तर सरावासाठी प्रतिस्पर्धी मिळणे शक्यच होत नव्हते, अशी भावना मेरीने व्यक्त केली.

मनीषचा पराभव
पुरुषांमध्ये मनीषकडून मोठ्या अपेक्षा होत्या; पण ब्रिटनच्या मॅकक्रोमॅककडून त्याची १-४ अशी हार झाली. संपूर्ण सामन्यात मनीषने चांगला खेळ केला होता; परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये तो कमी पडला. ब्रिटनच्या या खेळाडूने अंतिम राऊंडमध्ये बचावाचा पवित्रा बदलत मनीषवर जोरदार आक्रमण केले आणि तेथेच सामन्याचा निकाल बदलला.

पहिल्या राऊंडध्ये मनीषने चांगले ठोसे मारले. गुणांची बरोबरी होती; परंतु अंतिम टप्प्यात जजनी मॅकक्रोमॅकच्या पारड्यात गुणांचे दान अधिक टाकले.

माझ्याकडे विश्वविजेते, ऑलिंपिक, राष्ट्रकुल अशी सर्व पदके आहेत. त्यांची मोजदाद करणेही सोपे नाही; पण सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करत राहणे आणि जिंकत राहणे सोपे नसते. ऑलिंपिक सुवर्णपदक हे माझे लक्ष्य आहे आणि त्यासाठी मी सर्वस्व पणास लावणार आहे.
- मेरी कोम


​ ​

संबंधित बातम्या