निर्बंध टाळण्यासाठी मेरी इटलीमार्गे टोकियोला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय उपखंडातून येणाऱ्या खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांवर कठोर निर्बंध असतील, असे संयोजकांनी जाहीर केले आहे. हे टाळण्यासाठी मेरी कोमने इटलीमार्गे टोकियोला जाण्याचे ठरवले आहे.

नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय उपखंडातून येणाऱ्या खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांवर कठोर निर्बंध असतील, असे संयोजकांनी जाहीर केले आहे. हे टाळण्यासाठी मेरी कोमने इटलीमार्गे टोकियोला जाण्याचे ठरवले आहे.

भारतीय बॉक्सिंग संघातील अनेक खेळाडू सध्या इटलीत सराव करीत आहेत. तेथूनच ते टोकियोस रवाना होणार आहेत. मेरी कोमने याऐवजी पुण्यातील लष्कर क्रीडा संस्थेत सराव करण्यास प्राधान्य दिले होते. ‘‘मी विचार बदलला आहे. मी दिल्लीस परतले आहे. दोन दिवसांत इटलीस रवाना होणार आहे. तेथील सरावानंतर टोकियोस जाणार आहे. भारतातून गेल्यास तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे, त्यामुळे सरावाची लय जाण्याचा धोका होता,’’ असे मेरीने सांगितले.

ऑलिंपिकसाठी कसून सराव केला आहे. त्यात क्वचितच ब्रेक घेतला आहे. स्पर्धा काही दिवसांवर असताना त्यात ब्रेक घेण्यास तयार नाही असे तिने सांगितले. मेरी कोम मार्गदर्शक छोटेलाल यादव आणि फिझिओंसह इटलीस जाणार आहे. भारतीय बॉक्सिंग संघ इटलीतील अॅसीसी येथे सराव करीत आहे. हा संघ १० जुलैस मायदेशी परतणार होता आणि त्यानंतर भारतातून स्पर्धेस प्रयाण करणार होता; मात्र आता संघ इटलीतून टोकियोस जाणार आहे.

संयोजन समितीने भारतातून येणाऱ्या खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांना टोकियो प्रयाणापूर्वी रोज सात दिवस चाचणी करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर जपानमध्ये तीन दिवसांचे कठोर विलगीकरण बंधनकारक असेल असेही स्पष्ट केले आहे.


​ ​

संबंधित बातम्या