पिस्तुलात बिघाड झाल्यामुळे मनू भाकरची अंतिम फेरी थोडक्यात हुकली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 July 2021

स्पर्धा सुरू असताना पिस्तुलात बिघाड झाल्यामुळे मनू भाकरला जवळपास २० मिनिटे नेमबाजीपासून वंचित राहावे लागले, पण त्यानंतरही या भारताच्या युवा स्टार नेमबाजाने प्रयत्नांची शर्थ केली; मात्र तिची अंतिम फेरी थोडक्यात हुकली.

टोकियो / मुंबई - स्पर्धा सुरू असताना पिस्तुलात बिघाड झाल्यामुळे मनू भाकरला जवळपास २० मिनिटे नेमबाजीपासून वंचित राहावे लागले, पण त्यानंतरही या भारताच्या युवा स्टार नेमबाजाने प्रयत्नांची शर्थ केली; मात्र तिची अंतिम फेरी थोडक्यात हुकली.

मनूचे पिस्तूल खराब झाले. त्या वेळी तिच्यासमोर ५५ मिनिटांत ४४ शॉटस् मारण्याचे लक्ष्य होते. मनू पिस्तूल दुरुस्त करून पुन्हा रेंजवर आली, त्या वेळी नवा प्रश्न होता. दुरुस्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा साईटर तपासण्यात चार ते पाच मिनिटे गेली. ती नेमबाजीस सज्ज झाली, त्या वेळी तिला सर्व शॉट केवळ ३६ मिनिटांत पूर्ण करावे लागणार होते. यामुळे तिची लय तसेच एकाग्रता हरपली.

खराब झालेले पिस्तूल सुरक्षेच्या कारणास्तव जागेवर दुरुस्त करता येत नाही. मनूला तिचे मार्गदर्शक समरेश जंग यांच्यासह ठरलेल्या ठिकाणी जावे लागले होते. मनूसाठी हा प्रश्न नवीन नव्हता. तिला यास २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत सामोरे जावे लागले होते, पण त्यातून वेळीच सावरत तिने पात्रता साध्य केली होती.

१९ वर्षीय मनूने या आव्हानानंतरही प्रयत्न सोडले नाहीत. तिने स्वतःला सावरत शांतपणे वेध साधत वेगाने प्रगती सुरू केली. तिचे एकंदर गुण ५७५ झाले. तिची अंतिम फेरी तीन गुणांनी हुकली. 

‘अखेरच्या सहाव्या सिरीजमध्ये १० पैकी चार प्रयत्नांत ती अचूक लक्ष्य साधू शकली नाही. त्यापूर्वीच्या सिरीजप्रमाणे तिने ९८ गुण साधले असते, तर अंतिम फेरी गाठली असती,’’ अशी टिप्पणी मार्गदर्शक रोनक पंडित यांनी केली. दरम्यान, याच गटात असलेली यशस्विनी सिंग देस्वाल हिने मनूपेक्षा कमी गुण नोंदविले.

ऑलिंपिक स्पर्धेत चांगली पिस्तूल असावीत यासाठी आम्ही दोन पिस्तूल मागवली होती. त्याच्यावरच सराव केला होता. तिचे पिस्तूल जुने आहे असे कसे म्हटले जाते तेच कळत नाही. यापूर्वी तिचे चंदेरी रंगाचे पिस्तूल होते; तर आताचे पिस्तूल जांभळ्या रंगाचे होते हे तर सर्वांनी बघितले असेल.
- रामकिशन भाकर, मनूचे वडील


​ ​

संबंधित बातम्या