मनूला तीन तिगाडा... चा फटका?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 July 2021

मनू भाकर ऑलिंपिक नेमबाजीतील मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत अपयशी ठरल्यावर ती आणि जसपाल राणा यांच्यात काही महिन्यांपूर्वी झालेला वाद, मनू तीन स्पर्धांत नको ही जसपाल राणा यांची सूचना, आता त्यास मनूने दिलेले उत्तर याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई - मनू भाकर ऑलिंपिक नेमबाजीतील मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत अपयशी ठरल्यावर ती आणि जसपाल राणा यांच्यात काही महिन्यांपूर्वी झालेला वाद, मनू तीन स्पर्धांत नको ही जसपाल राणा यांची सूचना, आता त्यास मनूने दिलेले उत्तर याची चर्चा सुरू झाली आहे.

मनूची कारकीर्द घडविण्यात जसपाल राणा यांचा मोलाचा वाटा आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद झाले होते. ते दूर करण्याचे भारतीय नेमबाज संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांचे प्रयत्न फोल ठरले. आता भारतीय नेमबाजीच्या अपयशावर टिप्पणी करताना रनिंदर सिंग यांनी भारतीय नेमबाजीत एकाचीच सातत्याने नकारात्मक भूमिका होती, मी जसपाल राणांबद्दल बोलत आहे, असे रनिंदर यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांनी प्रत्येक प्रकारासाठी नेमबाजांची निवड करताना गुणवत्ता हाच निकष बाळगला होता हेच पुन्हा सांगितले.

जसपाल यांनी ऑलिंपिक स्पर्धा काही दिवसांवर आली असताना पुन्हा मनूची तीन प्रकारांसाठी निवड करणे चुकीचे आहे असे सांगितले होते. आता त्यांच्या अनुपस्थितीचा फटका मनूला बसत असल्याचे सांगितले जात आहे. या स्पर्धेतील अपयशाबद्दल मी जसपाल यांना जबाबदार धरणार नाही, पण मनूच्या अपयशासाठी काही प्रमाणात त्यांच्या अनुपस्थितीचा फरक पडला असेल असे त्यांनी सांगितले.

मिश्र दुहेरीतील अपयशानंतर मनूसमोर तीन स्पर्धांच्या सहभागाचा विषय काढल्यावर ती चिडलीच. मी तीन स्पर्धांत काही पहिल्यांदा खेळत नाही, त्यामुळे त्याचे दडपण येण्याचा प्रश्नच येत नाही असे तिने सुनावले. मार्गदर्शक बदलाबद्दल आता काहीही बोलणे योग्य होणार नाही. सध्याचे मार्गदर्शकही चांगले आहेत, असेही तिने सांगितले.

कदाचित तुमच्या लक्षात नसेल, पण तीन प्रकारांत तीन वर्षांपासून नेमबाजी करीत आहे. हे प्रत्येक स्पर्धेत केले आहे. त्यामुळे याचे दडपण आत्ताच कसे असेल. मी एकाच प्रकारात खेळले असते तर कामगिरी यापेक्षा नक्कीच चांगली झाली असती का... तर नक्कीच नाही.
- मनू भाकर


​ ​

संबंधित बातम्या