एकतर्फी लढतीत मनिकाची हार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 July 2021

राष्ट्रीय मार्गदर्शकांचे मार्गदर्शन नाकारलेल्या मनिका बत्राचे ऑलिंपिक टेबल टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तिला दहाव्या मानांकित सोफिया पोल्कानोवा हिच्याविरुद्ध ०-४ अशी एकतर्फी हार पत्करावी लागली आणि त्यानंतर तिला अश्रू आवरले नाहीत.

टोकियो / मुंबई - राष्ट्रीय मार्गदर्शकांचे मार्गदर्शन नाकारलेल्या मनिका बत्राचे ऑलिंपिक टेबल टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तिला दहाव्या मानांकित सोफिया पोल्कानोवा हिच्याविरुद्ध ०-४ अशी एकतर्फी हार पत्करावी लागली आणि त्यानंतर तिला अश्रू आवरले नाहीत.

मनिकाने दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत ३२ व्या असलेल्या खेळाडूस हरविले होते, पण यावेळी ती ऑस्ट्रियन प्रतिस्पर्धीस आव्हान देऊ शकली नाही आणि तिला ८-११, २-११, ५-११, ७-११ अशी हार पत्करावी लागली. मनिकाला तिसऱ्या गेममध्ये सलग आठ गुण गमवावे लागले. संपूर्ण सामन्यात तिला कधीही सलग दोनपेक्षा जास्त गुण जिंकता आले नाहीत. 

सरस प्रतिस्पर्धीची खोलवरची सर्व्हिस मनिकासाठी चांगलीच डोकेदुखी ठरली. मनिका २७ मिनिटांत पराजित झाली, त्यातील दुसरा गेम तर तिने दोनच मिनिटांत गमावला होता. या एकतर्फी पराभवामुळे तिला अश्रू आवरत नव्हते. तिने माध्यमांशी बोलण्यासही नकार दिला. 

सुतिर्था मुखर्जी ४२ वर्षीय यु फु हिच्याविरुद्ध सरळ गेममध्ये पराजित झाली. तिला २३ मिनिटांतच ३-११ ३-११ ५-११ ५-११ अशा पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे टेबल टेनिसमधील भारताच्या आशा शरथ कमल याच्यावरच आहेत. त्याने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. त्याची आता लढत गतविजेत्या मॅ लाँग याच्याविरुद्ध होईल.


​ ​

संबंधित बातम्या