रेल्वेच्या मैदानांवर आता खेळांचे ‘लॉकडाउन’?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 June 2021

मैदान निगराणीच्या वाढत्या खर्चामुळे रेल्वेने देशातील पंधरा क्रीडा सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. रेल्वेच्या या निर्णयाचा परळ येथील इनडोअर स्टेडियम तसेच महालक्ष्मी येथील रेल्वे मैदानास फटका बसणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.

निगराणीच्या वाढत्या खर्चामुळे निर्णय, मुंबईसह देशातील १५ स्टेडियमवर व्यावसायिक कार्यक्रम होणार
मुंबई - मैदान निगराणीच्या वाढत्या खर्चामुळे रेल्वेने देशातील पंधरा क्रीडा सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. रेल्वेच्या या निर्णयाचा परळ येथील इनडोअर स्टेडियम तसेच महालक्ष्मी येथील रेल्वे मैदानास फटका बसणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. 

रेल्वे मंडळाने रेल्वे जमीन विकास प्राधिकरणास पंधरा स्टेडियमची जागा ताब्यात घेऊन त्यातून व्यावसायिक उत्पन्न कसे मिळवता येईल, याचा विचार सुरू झाला आहे. या जागेचा विकास करताना आर्थिक तसेच तांत्रिक मुद्दे लक्षात घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार ही विकास प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले आहे. सर्व विभागीय व्यवस्थापकांना मैदानाबाबतची कागदपत्रे रेल्वे जमीन विकास प्राधिकरणास देण्यास सांगितली आहे.  

रेल्वेची देशभरातील मैदाने मोक्याच्या ठिकाणी आहेत. ही जागा खासगी विकासकांना विकून निधी उभारण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्त आहे. या निर्णयानुसार बीएलडब्ल्यू (वाराणसी), चेन्नई, कोलकता, रायबरेली, मालिगाव (गुवाहाटी), कपूरथळा, सिकंदराबाद येथील रेल्वे क्रीडा संकुलासह परळ तसेच पाटणा येथील बंदिस्त स्टेडियम, याचबरोबर भुवनेश्वर, बहाला (कोलकता), महालक्ष्मी येथील रेल्वे स्टेडियम, येलाहांका (बंगळूर) येथील क्रिकेट स्टेडियम तसेच लखनौ आणि गोरखपूर येथील स्टेडियमची विक्री होणार आहे. 

दरम्यान, कपूरथळा, येलाहांका (बंगळूर), वाराणसी तसेच चेन्नई येथील मैदाने रेल्वेच्या कार्यशाळेच्या परिसरात आहेत. तिथे रेल्वे वसाहतीही आहेत. क्रीडा संकुले त्याचा भाग आहेत. याचवेळी परळ, महालक्ष्मी येथील क्रीडा सुविधा या रेल्वेच्या विभागांकडे आहेत. दरम्यान, ही स्टेडियमच्या क्रीडा सुविधा कायम राखताना त्याचा खासगी उपयोग होऊ शकतो का, याचाही रेल्वे विचार करीत असल्याचे वृत्त आहे.  

अखिल भारतीय रेल्वेमन महासंघाने यास विरोध केला आहे. रेल्वेची ही सर्व स्टेडियम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. त्याचा उपयोग रेल्वेतील क्रीडापटू तसेच क्रीडाप्रेमी करतात, याकडे लक्ष वेधले आहे. 

रेल्वेचा क्रीडा दबदबा

  • देशातील अनेक क्रीडा स्पर्धांत रेल्वेचे संघ सरस
  • महिला क्रिकेटपटूंसाठी सध्या रेल्वे ही सर्वांत मोलाची संधी
  • हॉकी, अॅथलेटिक्स या खेळातही रेल्वेचे प्रमुख साह्य
  • महेंद्रसिंग धोनी, पी. टी. उषा, सुशील कुमार, मोहम्मद शाहीद, विजेंदर सिंगयासारखे अव्वल खेळाडू रेल्वेचे
  • भारतीय क्रिकेट मंडळ, हॉकी इंडिया, भारतीय फुटबॉल महासंघाचाही त्यात समावेश

​ ​

संबंधित बातम्या