मिशन एव्हरेस्ट! हाती तिरंगा घेवून करवीरकन्या पुन्हा सज्ज; मुलीच्या जिद्दीसाठी बापाची धडपड

संभाजी गंडमाळे, सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

आजवर तिने कैक किलोमीटरची भटकंती केली. अनेक डोंगर, शिखरं पादाक्रांत केली. पण, "मला एव्हरेस्टवर तिरंगा फडकवायचा आहे' अशी तिने इच्छा व्यक्त करताच या बापानेही क्षणाचाही विलंब न करता संमती दिली.

कोल्हापूर : 'दंगल' सिनेमा पाहिला की साऱ्यांनाच एक वेगळी प्रेरणा मिळते. पण कोल्हापूर येथील एका बापाची आणि त्याच्या मुलीची एक वेगळीच 'दंगल' गेली वर्षभर सुरू आहे. मुलीला जगातील सर्वोच्च हिमशिखरावर तिरंगा फडकवायचा आहे. तिच्या या जिद्दीसाठी बापानेही पायाला भिंगरी बांधली आहे. गेल्या मार्चमध्येच ती मोहिमेवर जाणार होती. पण, लॉकडाऊनमुळे सारे जगच ठप्प झाले आणि तिची मोहिमही थांबली. दरम्यान, लॉकडाऊन काळातही तिचा रोजचा सात तासाचा सराव सुरूच राहिला आणि आता ती पुन्हा मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. एव्हरेस्ट मोहिमेचाच एक भाग म्हणून ती नुकतीच फ्रोझन वॉटरफॉल आईस क्‍लायंबिगची मोहिम फत्ते करून परतली आहे. कस्तुरी सावेकर असं या साहसी मोहिमवीर तरूणीचं नाव. 

पदभ्रंमती मोहिमांत रमणारे दीपक सावेकर व्यवसायाने फोर व्हिलर मेकॅनिक. कस्तुरी तीन वर्षांची असल्यापासून त्यांच्यासोबत विविध मोहिमांना जावू लागली. आजवर तिने कैक किलोमीटरची भटकंती केली. अनेक डोंगर, शिखरं पादाक्रांत केली. पण, "मला एव्हरेस्टवर तिरंगा फडकवायचा आहे' अशी तिने इच्छा व्यक्त करताच या बापानेही क्षणाचाही विलंब न करता संमती दिली. पण, या मोहिमेसाठी सुमारे पंचेचाळीस लाखांचा खर्च पेलवणार कसा, हा प्रश्‍न होताच. हा बाप मग घराबाहेर पडला. पै-पै जमवू लागला. शाळा-महाविद्यालयात जावून मोहिमेची माहिती देवू लागला. समाजातील विविध सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात पुढेही केला.

पुजारानं केलाय असाही पराक्रम; टी20 मध्ये झळकावलं होतं शतक!

मोहिमेची तयारी सुरू झाली. खर्चाची निम्मी रक्कम त्यातून जमा झाली. आणखी काही लोकांनी मदतीची ग्वाही दिली. पण, याच दरम्यान कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आणि ही सर्वच मोहिम थांबली. आता पुन्हा या बाप-लेकीची धडपड सुरू झाली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ती मोहिमेसाठी जाणार आहे. मात्र, या बाप-लेकीच्या या धडपडीला समाजातील दातृत्वाच्या पंखांची साथ महत्वाची ठरणार आहे. 

रक्षा मंत्रालयाकडूनही गौरव 

तळपती तलवार चालवणारी, तितक्‍याच चपळाईनं लाठी-काठी खेळणारी, बघता बघता एकेक डोंगर- शिखर सर करणारी, सायकलबरोबरच घोडेस्वारी आणि जलतरणात प्राविण्य मिळवलेली कस्तुरी. तिने वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत हिमालयातील तब्बल 137 मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. नेपाळमधील सर्वोच्च एकवीस हजारहून अधिक फूट उंची असलेलं माऊंट मेरा शिखर सर केले आहे. भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने तिला गौरविले आहे.

सर्व प्रकारची प्रशिक्षणं तिनं अगदी 'अ' श्रेणीत पूर्ण केली आहेत. तिच्या या मोहिमांची यादीच इतकी मोठी आहे की ती एव्हरेस्ट नक्कीच सर करू शकते आणि त्यासाठी आवश्‍यक ती सर्व पूर्वतयारी तिने अगदी नेटाने केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या