ऑलिंपिक नेमबाजीमध्ये भारताची ताकद वाढती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 July 2021

नव्या सहस्रकापासून भारतास बहुविध क्रीडा स्पर्धांत नेमबाजी स्पर्धेत कायम पदकाची अपेक्षा असते. या खेळात शस्त्रानुसार तीन प्रमुख प्रकारांत स्पर्धा होते असे म्हटले जाते.

नव्या सहस्रकापासून भारतास बहुविध क्रीडा स्पर्धांत नेमबाजी स्पर्धेत कायम पदकाची अपेक्षा असते. या खेळात शस्त्रानुसार तीन प्रमुख प्रकारांत स्पर्धा होते असे म्हटले जाते. ते आहेत एअर रायफल (१० आणि ५० मीटर), एअर पिस्तूल (१० आणि २५ मीटर) तसेच शॉटगन (स्कीट आणि ट्रॅप). रायफल आणि पिस्तूलच्या स्पर्धा प्रामुख्याने इनडोअर होतात; तर शॉटगनची स्पर्धा आउटडोअर. यातील ५० मीटर थ्री पोझीशन प्रकारात नेमबाज नीलींग, प्रोन आणि स्टँडिंगमध्ये लक्ष्यवेध करतात.

ब्रिटन आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अमेरिकेत टार्गेट शूटिंग लोकप्रिय होते. त्यामुळे १८९६ च्या पहिल्या आधुनिक स्पर्धेपासून या खेळास स्थान. अपवाद केवळ १९०४ आणि १९२८ च्या स्पर्धेचा. केवळ पेनाचे टिंब दिलेल्या भागात अचूक लक्ष्यवेध साधण्याचे प्रयत्न करणारे नेमबाज कमालीच्या दडपणाखाली लक्ष्य साधतात. त्यासाठी रिलॅक्सेशन आवश्यक असते. दशांश गुणांच्या फरकाने सुवर्णपदक जिंकता येते तसेच पदकापासून वंचितही राहावे लागते. १५ प्रकारांत १०० देशांहून जास्त नेमबाज आपले कसब पणास लावतात. प्राथमिक फेरीतील अव्वल नेमबाज आणि तळाचा स्पर्धक यातील फरक केवळ काही गुणांचा असतो, त्यावरून चुरस लक्षात येईल.

किती पदके - पुरुष तसेच महिला विभागात मिळून १५ सुवर्णपदकांसाठी चुरस. त्यात वैयक्तिक तसेच मिश्र दुहेरीतीलही.

रिओत काय घडले - अंतिम फेरीतील रंगत वाढविण्यासाठी ठराविक शॉटनंतर स्पर्धक बाद होण्यास सुरुवात झाली, तसेच उपांत्य आणि पदक निश्चित करणाऱ्या लढती झाल्या. इटलीने सर्वाधिक चार सुवर्णपदके जिंकली; तर जर्मनीने तीन. कोरियाच्या जिन लाँग ऑ याने सलग तीन स्पर्धांत पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम पूर्ण केला. ही कामगिरी करणारा तो स्पर्धेतील पहिला नेमबाज ठरला.

टोकियोत काय - जिन सलग चौथ्या सुवर्णपदकासाठी प्रयत्न करणार आहे. पुरुषांच्या थ्री पोझीशन प्रकारात सलग तीन सुवर्णपदके जिंकलेला निकोलो कॅम्प्रिआनी निवृत्त झाल्याने या वेळी नवा विजेता गवसेल. जॉर्जियाचा निनो सालुकवाद्झे विक्रमी नवव्या स्पर्धेत खेळणार आहे.

नवे काय - पुरुष आणि महिलांच्या प्रत्येकी सहा स्पर्धांबरोबरच मिश्र दुहेरी प्रकारात तीन स्पर्धा होतील. स्पर्धा इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे.
स्पर्धा कालावधी - २४ जुलै ते २ ऑगस्ट

कुठे स्पर्धा - असाका शूटिंग रेंजवरच १९६४ च्या टोकियो ऑलिंपिकमधील नेमबाजी स्पर्धा झाली होती. मुख्य स्टेडियमपासून ३० किलोमीटर दूर असलेल्या रेंजवरच यंदाचीही स्पर्धा होईल.

भारतीय आव्हान - भारतीय संघातील जवळपास प्रत्येक नेमबाजाने विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. राही सरनोबत, मनू भाकर, दिव्यांश सिंग पन्वर, सौरभ चौधरी, एलवेनिल वैलेरियन, अभिषेक वर्मा हे नक्कीच पदकाचे प्रबळ दावेदार आहेत.

जाता-जाता - १९३९ च्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत पिस्तूल प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकलेल्या हंगेरीच्या संघात कॅरोली टॅकाक्स यांचा समावेश होता. ग्रेनेड उजव्या हातात असतानाच फुटल्याने त्यांची कारकीर्द संपली असेच सर्वांना वाटले, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. डाव्या हाताने शूटिंग करण्यास सुरुवात केली आणि एवढेच नव्हे, तर १९४८ आणि १९५२ च्या स्पर्धेत रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले.


​ ​

संबंधित बातम्या