भारतातून येणाऱ्या कोणासही जपानमध्ये प्रवेश नसल्याने भारतीयांचे ऑलिंपिक संकटात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 May 2021

भारतातून येणाऱ्या कोणासही जपानमध्ये आता प्रवेश नसेल. भारतीय उपखंडातील कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे जपान सरकारने हा निर्णय घेताना भारतात मुक्काम केलेल्या कोणासही प्रवेश नसेल हे स्पष्ट केले.

टोकियो - भारतातून येणाऱ्या कोणासही जपानमध्ये आता प्रवेश नसेल. भारतीय उपखंडातील कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे जपान सरकारने हा निर्णय घेताना भारतात मुक्काम केलेल्या कोणासही प्रवेश नसेल हे स्पष्ट केले. यामुळे अडीच महिन्यांवर आलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघांचा सहभागच संकटात आला आहे. 

जपानमध्ये येण्यापूर्वी चौदा दिवस भारतात असल्यास त्या परदेशी व्यक्तींना देशात प्रवेश नसेल आणि याची कसोशीने अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू होईल, असे जपान सरकारने जाहीर केल्याचे वृत्त जपान टाइम्स तसेच क्योडो वृत्तसंस्थेने दिले आहे. जपानवासीयांसाठी हे निर्बंध सध्या काहीसे शिथिल असले तरी त्यात वाढ होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. 

भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तसेच तेथील कोरोना हा जास्त धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हेच सांगितले आहे. अर्थात यापूर्वीच ब्रिटन, जर्मनी, अमेरिकेने याप्रकारचे निर्बंध घातले आहेत, पण त्यांनी आपल्या देशवासीयांना सूट दिली होती. मात्र जपानने ऑस्ट्रेलियासारखाच कठोर निर्णय घेतला आहे. 

जपानमध्ये बी.१.६१७ या कोरोनाचे आत्तापर्यंत ७० रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६६ विमानतळावरील तपासणीत आढळले आहेत. त्यामुळे भारत, नेपाळ आणि पाकिस्तानातून येणाऱ्या जपानवासीयांना आता सहा दिवस सरकारने निश्चित केलेल्या ठिकाणी विलगीकरणात जावे लागेल. त्यानंतरचे आठ दिवस स्वयंविलगीकरण करावे लागेल. 

ऑलिंपिकमधील बाधितांसाठी बेड नाही
ऑलिंपिक स्पर्धेसाठी जपानमध्ये आलेल्या कोणासही कोरोना उपचारासाठी बेड देणार नाही, असे जपानमधील चिबा येथील सरकारने स्पष्ट केले. चिबा हा टोकियो शेजारील प्रांत आहे. ऑलिंपिक स्पर्धेच्या कालावधीत टोकियोतील ३० आणि त्याच्या शेजारील प्रांतातील रुग्णालयांची मदत घेण्याचे जपान सरकारने ठरवले आहे, पण चिबा तसे कुमागाई यांनी आमची साथ मिळणार नाही हे स्पष्ट केले आहे.

भारतातून येणाऱ्यांना प्रवेश बंदी असेल, तसेच त्यांच्यावर विलगीकरणाची सक्ती असेल, तर आमचे खेळाडू अन्य देशातून जपानला जातील. जपानने प्रतिबंध न केलेल्या देशात एक ते दीड महिना सराव करुन ते टोकियोस रवाना होऊ शकतील.
- नरींदर बत्रा, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष

नव्या कोरोनाची जपानमध्ये चिंता
ओसाका - रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी ओसाका प्रांतात १८ जणांचे दोन महिन्यात कोरोनामुळे निधन झाले आहे. निधन झालेल्यांपैकी बहुतेकांचे वय ६० पेक्षा जास्त आहे, पण एक जण तिशीतील आहे, ही बाब चिंतेची आहे.


​ ​

संबंधित बातम्या