भारतीयांना मिळाले टोकियो ऑलिंपिकचे तिकिट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 May 2021

कुस्तीगीर अमित मलिकने गुडघ्याच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करीत टोकियो ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न पूर्ण केले. ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्य साध्य झाल्यामुळे सुमित स्पर्धेतील अंतिम लढतीतून माघार घेण्याची शक्यता आहे.

मुंबई - कुस्तीगीर अमित मलिकने गुडघ्याच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करीत टोकियो ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न पूर्ण केले. ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्य साध्य झाल्यामुळे सुमित स्पर्धेतील अंतिम लढतीतून माघार घेण्याची शक्यता आहे. भारतीय कुस्ती महासंघ या दिशेने विचार करीत आहे. 

ऑलिंपिक पात्रता साध्य करण्याचे सुमितचे स्वप्न होते. आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेपूर्वी दहा दिवस दुखापत झाल्यानंतरही त्याने हार मानली नाही. या स्पर्धेत केवळ पंधरा सेकंद असताना तो उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाला होता, त्यामुळे या स्पर्धेत चांगल्या कामगिरीसाठी आसुसलेला होता आणि त्याने आपले स्वप्न साकारले, असे भारतीय संघाचे मार्गदर्शक जगमिंदर सिंग यांनी सांगितले. 

आपल्या सर्वांना आठवत असेल, तो उपांत्यपूर्व फेरीत हरल्यानंतर तो रिपेचेजमध्ये खेळला नव्हता. त्यावेळी या स्पर्धेत हुकलेली संधी जागतिक ऑलिंपिक पात्रतेत साधणार अशी ग्वाही त्याने दिली होती. त्याने आपले शब्द खरे करून दाखवले, असेही त्यांनी सांगितले. गुडघ्याची दुखापत भरून निघण्यास वेळ लागतो. संघासोबत मसाजर तसेच फिझिओ आहेत. ते त्याच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. 

सुमितने १२५ किलो गटातील पात्रता निश्चित करताना उपांत्य फेरीत व्हेनेझुएलाच्या डॅनियल दिआझ रॉबर्टी याला ५-० असे हरवले. डॅनियल यापूर्वी दोनदा ऑलिंपिक खेळला आहे, त्यामुळे त्याचे पारडे सरस मानले जात होते. सुमितने वेगवान आक्रमण करीत पहिला गुण जिंकल्यावर डॅनियलने सर्वस्व पणास लावत प्रतिहल्ला सुरू केला, त्यामुळे सुमितने बचावाकडे लक्ष दिले. त्याने छान प्रतिआक्रमण केले आणि भारताची कुस्तीतील सातवी पात्रता निश्चित केली. यापूर्वी रवी दहिया (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) यांच्यासह विनेश फोगट (५३ किलो), आंशू मलिक (५७ किलो) आणि सोनम मलिक (६२ किलो) पात्र ठरले आहेत. 

नवीन कुमार स्पर्धेसाठी अपात्र
नवीन कुमार कोरोना चाचणीत पॉझिटिव ठरल्याने स्पर्धेत खेळण्यास अपात्र ठरला आहे. तो ग्रीको रोमनमधील ९७ किलो गटात खेळणार होता. काही महिन्यांपूर्वी त्याला कोरोना झाला होता, पण त्यातून तो बरा झाला होता. बुधवारच्या चाचणीत नवीन वगळता अन्य सर्व भारतीय निगेटीव आढळले. नवीनमध्येही कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे भारतीय ग्रीको रोमन संघाचे मार्गदर्शक हरगोविंद सिंह यांनी सांगितले. 

दुखापतीनंतरही सुमित हार मानत नाही. आशियाई स्पर्धेत थोडक्यात हुकलेली पात्रता त्याला सलत होती. ऑलिंपिक पात्रतेची ही अखेरची संधी आहे हे तो जाणून होता, त्यामुळे त्याने जिगरबाज तसेच संयमी कुस्ती केली.
- जगमिंदर सिंग, मार्गदर्शक.


​ ​

संबंधित बातम्या