चक दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघ अर्जेंटिनाला रवाना

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 3 January 2021

राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघ आज अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर रवाना झाला. कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच भारतीय महिला संघ मैदानावर उतरणार आहे.

राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघ आज अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर रवाना झाला. कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच भारतीय महिला संघ मैदानावर उतरणार आहे. भारतीय महिला हॉकी संघ अर्जेंटीनात कोरोनाच्या संकटानंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास वर्षभर भारतीय महिला हॉकी संघाला बंगळुरूमधील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) केंद्रातच सराव करावा लागला होता. आणि त्यानंतर आता भारतीय संघ आणि जागितिक क्रमांकावर दुसऱ्या स्थानी असलेला अर्जेंटिना यांच्यात चार सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील पहिला सामना 26 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर 28, 30 आणि 31 जानेवारी रोजी पुढील तीन सामने होणार आहेत. या सामन्यांच्या अगोदर भारतीय संघ अर्जेंटिनाच्या कनिष्ठ संघ आणि ब संघासोबत सराव सामने खेळणार आहे. 

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील सामने हे जैव-सुरक्षित वातावरणात खेळवण्यात येणार आहेत. तसेच संघातील प्रत्येकाची वेळोवेळी कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. शिवाय भारतीय संघ अर्जेंटिनामध्ये पोहचल्यानंतर त्यांना क्वारंटाईन व्हावे लागणार नसले तरी, कोरोनाची खबरदारी म्हणून भारतीय संघ  जैव-सुरक्षित नियमांचे पालन करणार असल्याची माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे. 

भारतीय संघाची कर्णधार राणी रामपालने यावेळेस पुन्हा मैदानात उतरत असल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्याशिवाय मागील काही महिन्यांपासून दमदार सराव केलेला असल्यामुळे आगामी सामन्यांमध्ये उतरून चांगला खेळ करण्याची वेळ आल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त संघ पहिल्यांदाच जैव-सुरक्षित वातावरणात खेळणार असल्यामुळे अर्जेंटिनाचा हा दौरा वेगळा राहणार असल्याचे मत राणी रामपालने व्यक्त केले. 

भारतीय महिला संघ - राणी रामपाल (कर्णधार), सविता (उपकर्णधार), रजनी एतिमारपू, बिचू देवी खारीबम, बचावपटू गुरजित कौर, दीप ग्रेस एक्का, रश्मिता मिंज, मनप्रीत कौर, रीना खोखर, सलीमा तेटे, निशा, सुशीला चानू पुखरामम्, लिलिमा मिंज, नेहा गोयल, नमिता टोप्पो, मोनिका, निकी प्रधान, वंदना कटारिया, नवनीत कौर, नवजोत कौर, ज्योती, उदिता, राजविंदर कौर, लालरेम्सियामी आणि शर्मिला देवी.    


​ ​

संबंधित बातम्या