भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह उपांत्य फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 August 2021

भारतीय महिला हॉकी संघाने अक्षरशः चक दे... अनुभव चाहत्यांना दिला. या स्पर्धेतील गटसाखळीत जेमतेम दोन लढती जिंकत बादफेरी गाठलेल्या महिला हॉकी संघाने संभाव्य विजेत्यांत गणना होत असलेल्या ताकदवान ऑस्ट्रेलियास पराजित करून उपांत्य फेरीत धडक मारली.

टोकियो / मुंबई - भारतीय महिला हॉकी संघाने अक्षरशः चक दे... अनुभव चाहत्यांना दिला. या स्पर्धेतील गटसाखळीत जेमतेम दोन लढती जिंकत बादफेरी गाठलेल्या महिला हॉकी संघाने संभाव्य विजेत्यांत गणना होत असलेल्या ताकदवान ऑस्ट्रेलियास पराजित करून उपांत्य फेरीत धडक मारली.

भारतीय पुरुष हॉकी संघाची १९७२ नंतरच्या स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी सुखावणारी असतानाच महिला हॉकी संघाने चाहत्यांचे मन जिंकत जणू ‘फिर दिल दे इंडियन हॉकी को’ ही सादच घातली. ऑस्ट्रेलियास गेल्या चार स्पर्धात उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. त्यांची ही पीछेहाट कायम ठेवली ती या स्पर्धेतील गटसाखळीत तब्बल १४ गोल स्वीकारलेल्या भारतीय महिला संघाने. ऑस्ट्रेलियाने संपूर्ण साखळीत १३ गोल करताना एकच गोल स्वीकारला होता; पण भारताने त्यांच्याविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत केलेला एक गोल या सर्वांवर भारी पडला.

गुरजित कौरने २२ व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल तसेच सविता पुनियाचे भक्कम गोलरक्षण यामुळे भारताने १-० बाजी मारली, असे म्हणणे सोपे होईल; पण या विजयाचे श्रेय आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरित झालेल्या संपूर्ण महिला हॉकी संघाला द्यायला हवे.

सामन्यातील सुरवात काही धक्कादायक नव्हती; पण तेव्हाच काय घडू शकते, याचे संकेत मिळाले होते. ऑस्ट्रेलियाचा पहिला पेनल्टी कॉर्नर सविताने झेपावत रोखत भारतीय संघात जान आणली. भारतीयांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलक्षेत्रात अधिक नेटाने जाण्यास सुरवात केली. 

भारतास मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरसाठी गुरजित सज्ज झाली. त्या वेळी मनात धाकधुक होती. तिने या स्पर्धेत यापूर्वी एकही गोल केलेला नाही हे मनात येत होते; पण भारतीय महिला हॉकी संघ इतिहास बदलण्यासाठीच मैदानात उतरला होता. गुरजीतने चेंडू गोलरक्षिकेच्या उजवीकडे मागण्याची आपली तयारी असल्याचे दाखवित तिच्या डाव्या बाजूने वेगाने गोलजाळ्यात धाडला.

अशी झाली लढत...
तपशील             ऑस्ट्रेलिया    भारत

गोल/शॉट                 ०/१४         १/५
अचूकतेचे प्रमाण        ०%         २०%
मैदानी गोल               ०/५          ०/४
पेनल्टी कॉर्नर             ०/९          १/१
चेंडूवर वर्चस्व           ५१%        ४९%
गोलक्षेत्र प्रवेश            १७           ९
व्हिडीओ दाद             १            १
ग्रीन कार्ड                  १            २

भारताचेच दोन्ही संघ उपांत्य फेरीत
ऑलिंपिक हॉकी स्पर्धेतील भारताचा दबदबा अधोरेखीत होण्यास सुरुवात झाली आहे, केवळ दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केवळ भारताने केला आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारतासह, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीने उपांत्य फेरी गाठली आहे; तर महिलांच्या स्पर्धेत भारतासह अर्जेंटिना, नेदरलँडस् तसेच स्पेन / ब्रिटनने अखेरच्या चार संघांत स्थान मिळविले आहे.

आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
भारतीय महिला हॉकी संघाने प्रथमच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. भारताची ही स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. १९८० च्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ चौथा होता, पण त्या स्पर्धेत सहाच संघ होते आणि स्पर्धा साखळी पद्धतीने झाली होती. त्यानंतर प्रथमच संघ २०१६ च्या रिओ स्पर्धेद्वारे ऑलिंपिकला पात्र ठरला होता; मात्र त्या स्पर्धेत एकही विजय मिळविला नव्हता. आता टोकियोत सलग तीन लढती जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

लक्षवेधक

  • भारतीय महिला हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा केवळ पाचवा विजय
  • प्रतिस्पर्ध्यांतील यापूर्वीच्या ४१ लढतीत ऑस्ट्रेलियाचे ३१ विजय होते; तर भारताचे अवघे ४. सहा लढती बरोबरीत सुटल्या होत्या
  • ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियास हरविले

​ ​

संबंधित बातम्या