भारतीय नेमबाजांचा आता झॅग्रेबलाच सराव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 May 2021

भारतातील रोजच्या वाढत्या कोरोना रुग्णांचा नेमबाजांच्या पूर्वतयारीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी भारतीय नेमबाजी संघटनेने ऑलिंपिक पात्र नेमबाजांचे शिबिर झॅग्रेब (क्रोएशिया) येथे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - भारतातील रोजच्या वाढत्या कोरोना रुग्णांचा नेमबाजांच्या पूर्वतयारीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी भारतीय नेमबाजी संघटनेने ऑलिंपिक पात्र नेमबाजांचे शिबिर झॅग्रेब (क्रोएशिया) येथे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय नेमबाज झॅग्रेबला होणाऱ्या युरोपीय स्पर्धेत सहभागी होतील. त्यानंतर ते ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत तिथेच सराव करतील. या स्पर्धेसाठी नेमबाज ६ मे रोजी खास चार्टर विमानाने रवाना होणार आहेत. हे सर्व निर्णय घेत भारतीय नेमबाजी संघटनेने जणू देशातील क्रीडा संघटनांना पूर्वतयारीची दिशा दाखवली.

ऑलिंपिक पात्रता मिळवलेला अंगद वीर बाजवा हा स्कीट नेमबाज सध्या इटलीत सराव करीत आहे. मेईराज खानही इटलीत दाखल होईल. अन्य नेमबाज झॅग्रेब येथे सराव करणार आहेत. 

ऑलिंपिकच्या तयारीसाठी संघ झॅग्रेबला जात आहे. प्रवासात कोणालाही कोरोनाची बाधा होऊ नये यासाठीच चार्टर विमानाने संघ रवाना होईल.
- भारतीय नेमबाजी संघटनेचे पदाधिकारी

नेमबाजांसमोरील प्रश्न

  • वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दिल्लीत सराव धोकादायक
  • राजधानीतील तपमान मे, जूनमध्ये ५० अंशापर्यंत जाते, ते सरावास पोषक नाही
  • स्पर्धेपूर्वी तीन महिन्यांचा सलग सराव पोषक नाही, पण सध्याच्या परिस्थितीत पर्याय नाही
  • स्पर्धेपूर्वी शिबिरातील ब्रेकच्या वेळी नेमबाजी रेंजपासून दूर राहणे चांगले, पण परिस्थिती यास पोषक नाही.

​ ​

संबंधित बातम्या