आता काही बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही. काय चुकते तेच कळत नाही.

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 July 2021

आता काही बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही. काय चुकते तेच कळत नाही, अशी खंत ऑलिंपिक नेमबाजीच्या मिश्रदुहेरीतील धक्कादायक अपयशानंतर व्यक्त करण्यात आली.

टोकियो/ मुंबई - आता काही बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही. काय चुकते तेच कळत नाही, अशी खंत ऑलिंपिक नेमबाजीच्या मिश्रदुहेरीतील धक्कादायक अपयशानंतर व्यक्त करण्यात आली. भारतास या स्पर्धेत दोन पदकांची किमान आशा असताना भारताच्या चारपैकी एकाही जोडीस पदकाच्या फेरीत स्थान मिळविता आले नाही.

मनू भाकर आणि सौरभ चौधरी १० मीटर एअर पिस्तूलच्या पात्रतेतील पहिल्या फेरीत ५८२ गुणांसह अव्वल आले, त्या वेळी मनूने २८६ गुणच मिळविले आहेत, ही रुखरुख होती. त्याचबरोबर यशस्विनी सिंग देस्वाल आणि अभिषेक वर्मा ५६४ गुणच मिळवत स्पर्धेबाहेर गेले याची खंत होती. पहिल्या टप्प्यात अव्वल आलेली मनू- सौरभ जोडी दुसऱ्या टप्प्यात ३८० गुणांसह सातवी गेली आणि साखळीतच बाद झाली. चौथ्या क्रमांकावरील सर्बिया जोडीने त्यांना चार गुणांनी मागे टाकले होते. मनूने गमाविलेल्या १४ गुणांचा फटका बसला होता.  १० मीटर एअर रायफलच्या मिश्रदुहेरीत यापेक्षा निराशेस सामोरे जावे लागले. एलावेनिल वलारिवान आणि दिव्यांश सिंग पंवार ६२६.५ गुणांसह बारावे आले; तर अंजुम मौदगिल आणि दीपक कुमार ६२३.८ गुणांसह २९ व्या क्रमांकावर गेले. या प्रकारातही पहिल्या आठ जोड्या पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यास पात्र ठरतात. भारतीय यापासून दूर राहिले.

मिश्रदुहेरीच्या पहिल्या पात्रतेतील मनू-सौरभचा अव्वल क्रमांक सुखावणारा होता, पण त्यानंतर प्रगती करण्यात आपले नेमबाज दुर्दैवाने अपयशी ठरले. प्रयत्नांची शर्थ केल्यावरही सर्वोत्तम निकालाची अपेक्षा असते, पण प्रत्येक वेळा तो साध्य होईलच असे नाही.
- रोनक पंडित, भारतीय मार्गदर्शक

जे काही घडले ते अविश्वसनीय होते का, हा प्रश्नच नाही. ते घडले आहे. कदाचित जास्तीचे प्रयत्न केल्यामुळे लक्ष्यापासून दूर राहिले असेन. आमच्याकडून असलेल्या अपेक्षा, स्पर्धेबाबतची चर्चा यामुळे दडपण वाढले नाही. पुन्हा सांगते, कदाचित जास्तीचे प्रयत्न केल्यामुळे हे घडले असेल.
- मनू भाकर


​ ​

संबंधित बातम्या