दुःख विसरायला हवे, आता ब्राँझ लक्ष्य; मनप्रीत सिंगची भावना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 August 2021

दुसऱ्या सत्रात वर्चस्व गमावल्याचा आम्हाला बेल्जीयमविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत फटका बसला; पण दुःख करण्यासाठी आम्हाला वेळ नाही. ब्राँझ पदकाच्या लढतीसाठी स्वतःला तयार करावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि गोलरक्षक श्रीजेशने केले.

टोकियो - दुसऱ्या सत्रात वर्चस्व गमावल्याचा आम्हाला बेल्जीयमविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत फटका बसला; पण दुःख करण्यासाठी आम्हाला वेळ नाही. ब्राँझ पदकाच्या लढतीसाठी स्वतःला तयार करावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि गोलरक्षक श्रीजेशने केले. 

आम्ही स्पर्धा जिंकण्यासाठीच आलो होतो. आम्हाला संधी होती. प्रयत्नांची शर्थ केली होती; पण आम्ही जिंकू शकलो नाही. आता ब्राँझ पदकाच्या लढतीवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कसून पूर्वतयारी करावी लागेल आणि पदक जिंकावेच लागेल, असे मनप्रीत म्हणाला.

दीर्घ कालावधीनंतर भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला; पण सुवर्णपदक जिंकू शकलो नाही. ही निराशा बाजूला ठेवून आगामी लढतीचा विचार करावा लागेल. ही लढत आमच्यासाठी, भारतीय हॉकीसाठी जास्तच महत्त्वाची असेल. किमान आम्ही ब्राँझ जिंकायला हवे, असे मनप्रीत म्हणाला.

ऑलिंपिकमध्ये सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी आम्ही पाच वर्षे प्रयत्न केले होते. गेली पाच वर्षे एकमेकांसह कसून मेहनत घेतली होती. अंतिम फेरीत खेळण्याच्या योग्यतेची आमची कामगिरी होती; पण हे जमले नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

पराभवाने कमालीचे दुःखी आहेत; पण त्यासाठी वेळ नाही. हे सर्व विसरून भविष्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आता पराभवाचे दुःख करण्यापेक्षा ब्राँझ जिंकण्यासाठी प्रयत्न करणे जास्त आवश्यक आहे. हाच सामना पाहून नक्की कुठे चुकलो, हे समजून घ्यावे लागेल.
- श्रीजेश, गोलरक्षक

तब्बल ४१ वर्षांनी पुन्हा सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठीच मैदानात उतरलो होतो; पण आम्हाला हार पत्करावी लागली. आता आम्हाला ब्राँझ जिंकण्याची संधी आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित करावेच लागेल. हॉकीला कायम प्रकाशात ठेवण्यासाठी आम्हाला पदक जिंकावेच लागेल.
- रूपिंदर पाल सिंग, बचावपटू


​ ​

संबंधित बातम्या