भारताने ऑलिंपिक हॉकी स्पर्धेत स्पेनचे आव्हान ३-० असे परतविले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 July 2021

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धा डझनपेक्षा जास्त गोल स्वीकारल्याच्या नामुष्कीतून सावरताना भारताने ऑलिंपिक हॉकी स्पर्धेत स्पेनचे आव्हान ३-० असे परतविले. रूपिंदर पाल सिंगचे दोन गोल तसेच श्रीजेशचे प्रभावी गोलरक्षण यामुळे भारतास हा विजय साधता आला.

टोकियो / मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धा डझनपेक्षा जास्त गोल स्वीकारल्याच्या नामुष्कीतून सावरताना भारताने ऑलिंपिक हॉकी स्पर्धेत स्पेनचे आव्हान ३-० असे परतविले. रूपिंदर पाल सिंगचे दोन गोल तसेच श्रीजेशचे प्रभावी गोलरक्षण यामुळे भारतास हा विजय साधता आला.

भारताने पहिल्या सत्रात एका मिनिटाच्या अंतराने दोन गोल करीत विजयाचा पाया रचला. त्यानंतर स्पेनचा प्रतिकार श्रीजेशने रोखला. स्पेन विश्रांतीनंतर त्वेषाने मैदानात उतरले असे वाटत असतानाच भारताने तिसरा गोल करीत आघाडी वाढवली. भारताने त्यानंतर चिवट स्पेनला गोलपासून रोखत विजय निश्चित केला. रुपिंदरने १५ तसेच ५१ व्या मिनिटास आणि सिमरनजीत सिंगने १४ व्या मिनिटास गोल केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दारुण अपयश धुऊन काढण्यास उत्सुक असलेल्या भारतीय संघाने सुरवातीपासून आक्रमण करीत स्पेन बचावफळीवरील दडपण वाढवले. स्पेनची प्रतिआक्रमणे धोकादायक ठरू लागली. त्यांनी सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नरही मिळवला. हाच पेनल्टी कॉर्नर रोखताना भारताने पहिला गोल केला. प्रतिआक्रमणात उजव्या बगलेतून मिळालेल्या पासवर सिमरनजीतने गोल केला. त्यानंतर लागोपाठच्या दोन पेनल्टी कॉर्नरपैकी एकाचे पेनल्टी स्ट्रोकमध्ये रूपांतर भारताने केले आणि रूपिंदरने आघाडी वाढवली.

दुसऱ्या सत्रापासून स्पेन जास्त आक्रमक झाले. त्यांचे शॉर्ट पासेस भारतावरील दडपण वाढवू लागले; पण श्रीजेश आणि बचावफळीने स्पेनला गोलपासून रोखले. 

तिसऱ्या सत्रात चेंडूवरील वर्चस्वासाठी कडवा संघर्ष झाला. स्पेनचे यात वर्चस्व आहे हे पाहून भारताने बचावास पसंती दिली; पण प्रतिआक्रमणातील पेनल्टी कॉर्नर रूपिंदरने सत्कारणी लावत स्पेनवरील दडपण वाढविले. त्यानंतर स्पेनचे सर्व प्रयत्न भारतीय बचावाने विफल ठरविले.

अशी झाली लढत
तपशील         भारत     स्पेन

गोल /शॉट        ३/१०     ०/१६
यशाचे प्रमाण    ३०%     ०%
मैदानी गोल       १/५      ०/९
पेनल्टी कॉर्नर     १/४     ०/७
पेनल्टी स्ट्रोक्स    १/१       -
चेंडू वर्चस्व       ४८%    ५२%
गोलक्षेत्रात          १४      १७

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकतर्फी पराभवाच्या पार्श्वभूमीवरच हा निकाल समाधानकारक आहे. अजूनही प्रतिस्पर्ध्यांना पेनल्टी कॉर्नर दिले जात आहेत. पहिल्या सत्रातील २-० आघाडीनंतर संघ काहीसा रिलॅक्स झाला, हेही चुकीचे आहे. उगाचच दडपण निर्माण करण्याने, काहीतरी वेगळे करण्याने काहीही साध्य होत नाही. पहिल्या आणि चौथ्या सत्रात जसा खेळ केला, तोच विजय देतो.
- ग्रॅहम रीड, भारतीय मार्गदर्शक


​ ​

संबंधित बातम्या