मिश्र रिले शर्यतीत भारताला ब्राँझपदक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 August 2021

नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा जल्लोष अजून संपलेला नसताना ॲथलेटिक्समधील आणखी एका पदकाने भारतीय क्रीडाप्रेमींना जल्लोष करण्याची संधी मिळाली.

नैरोबी - नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा जल्लोष अजून संपलेला नसताना ॲथलेटिक्समधील आणखी एका पदकाने भारतीय क्रीडाप्रेमींना जल्लोष करण्याची संधी मिळाली. जागतिक ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत ४ बाय ४०० मिश्र रिले संघाने ब्राँझपदक जिंकून क्रीडाप्रेमींना ही संधी दिली. जागतिक पातळीवर रिले शर्यतीत पदक जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.

प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या संघात भारताने एक बदल करताना रशीदच्या जागेवर श्रीधरला संधी दिली; मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. भारताने ३ मिनिटे २०.६० सेकंद वेळ नोंदवत ब्राँझपदक निश्चित केले.

जागतिक ज्युनिअर स्पर्धेत भारताचे हे एकूण पाचवे पदक असून तिसरे ब्राँझपदक होय. यापूर्वी सीमा अंतिल व नवज्योत कौर यांनी थाळीफेकीत ब्राँझपदक जिंकले आहे. नीरज चोप्रा व हिमा दास यांनी भारताला यापूर्वी सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मिश्र रिलेत नायजेरियाने सुवर्ण; तर पोलंडने रौप्यपदक जिंकले.

त्यापूर्वी सकाळी भारतीय संघाची धमाकेदार सुरुवात झाली. अमनदीप सिंग धालीवालने गोळाफेक; तर एच. प्रिया मोहन हिने ४०० मीटर शर्यतीत अंतिम फेरी गाठली. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मिश्र रिले शर्यतीत अब्दुल रशीद, प्रिया मोहन, सुमी व कपिल या भारतीय संघाने ३ मिनिटे २३.६३ सेकंदाचा स्पर्धा विक्रम करीत धमाल उडवून दिली; मात्र पहिल्या हीटमध्ये (प्राथमिक फेरी) अव्वल स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण दुसऱ्या हीटमध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या नायजेरियाने ३ मिनिटे २१.६६ सेकंद वेळ देत स्पर्धा विक्रम आपल्या नावे केला. मुलींच्या ४०० मीटर शर्यतीत कर्नाटकची असलेल्या प्रिया मोहनने अंतिम फेरी गाठून पदक मिळवण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

अमनदीप अंतिम फेरीत
गोळाफेकीत अमनदीप सिंग धालिवालने १७.९२ मीटरवर गोळाफेकीत अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या १२ खेळाडूंत स्थान मिळवले.


​ ​

संबंधित बातम्या