दुसऱ्या सत्रात आघाडी वाढवण्यात भारताला अपयश, मनप्रीतचे सदोष टॅकलही भोवले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 August 2021

ताकदवान संघांविरुद्ध आघाडी वाढवण्याची संधी सोडल्यास प्रतिस्पर्धी त्वेषाने प्रतिहल्ला करून परास्त करतो. नेमका हाच अनुभव भारतीय हॉकी संघास जगज्जेत्या बेल्जियमविरुद्धच्या ऑलिंपिक स्पर्धेतील उपांत्य लढतीत आला.

टोकियो/ मुंबई - ताकदवान संघांविरुद्ध आघाडी वाढवण्याची संधी सोडल्यास प्रतिस्पर्धी त्वेषाने प्रतिहल्ला करून परास्त करतो. नेमका हाच अनुभव भारतीय हॉकी संघास जगज्जेत्या बेल्जियमविरुद्धच्या ऑलिंपिक स्पर्धेतील उपांत्य लढतीत आला. पहिल्या सत्रातील २-१ आघाडी वाढवण्याची सुवर्णसंधी दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीस दवडल्यामुळे गमावत गेलेल्या वर्चस्वाचा चौथ्या सत्रात चांगलाच फटका बसला. त्यामुळे सुवर्णपदकाच्या शर्यतीत जाण्याचे स्वप्न भंगले.

भारतास या उपांत्य लढतीत २-५ हार पत्करावी लागली. हा गुणफलक भारताच्या झुंजार खेळास न्याय देत नाही. अलेक्झांडर हेंड्रिक्सच्या हॅट्ट्रिकमुळे बेल्जियमनने बाजी मारली, पण खरे तर अखेरच्या १० मिनिटांपर्यंत किंबहुना सदोष बचावाबद्दल कर्णधार मनप्रीतला बाहेर काढले जाईपर्यंत लढतीत काहीही घडू शकत होते, त्यानंतर बेल्जियमनने तीन गोल करीत निकाल सोपा दाखवला.

कमकुवत बचाव ही भारताची दुखरी नस. चालायला सुरुवात केल्यापासून पायात चेंडू येत असलेले बेल्जियम व्यावसायिक टॅकल करण्यात वाकबगार नसले तरच नवल. भारतीय नेमके यातच कमी पडले. सदोष टॅकल विशेषतः गोलक्षेत्रात चेंडू पायाला लागत असल्यामुळे भारतीयांचे आव्हान अवघड झाले. याच चुकीमुळे १९ व्या मिनिटास लाभलेल्या पेनल्टी कॉर्नरमुळे सामना बरोबरीत आला. बेल्जियमच्या सुरुवातीच्या धडाक्यानंतर भारताने हुकुमत मिळवली होती, ती या गोलमुळे गमावली गेली. बेल्जियमची योजना सोपी होती, भारतीय बचावावर सतत दडपण आणत त्यांना गोलक्षेत्रापर्यंत मागे जाण्यास आणि त्यानंतर पेनल्टी कॉर्नर मिळवण्यास प्रयत्न करीत होते. हेंड्रिक्स आणि लुपेआर्ट संघात असताना हे अपेक्षितच होते.

सामना सुरू झाल्यावर मिनिटभरात बेल्जियमने पहिला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला, पण पाच मिनिटांत हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरच भारतास बरोबरी साधून दिली. दोनच मिनिटांत मनदीप सिंगने अमित रोहिदासच्या स्क्वेअर पासवर चेंडू वेगाने गोलजाळ्यात धाडताना बेल्जियम गोलरक्षकास संधीच दिली नाही. पहिल्या सत्रातील हे वर्चस्व वाढवण्याची संधी दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीस मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताने दवडली. त्यामुळे आत्मविश्वासाने प्रतिआक्रमण सुरू केलेल्या बेल्जियमने या सत्रात सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले. 

वाढती उष्णता तसेच दमट वातावरणामुळे संघ थकले होते, त्याचे प्रत्यंतर तिसऱ्या सत्रात दिसले. चौथ्या सत्रात सुरुवातीपासून बेल्जियम आक्रमक होते. मनप्रीतच्या सदोष टॅकलने भारताचा एक खेळाडू कमी झाला, ही संधी त्यांनी साधली. त्यांनी आघाडी घेतल्यावर ती कमी करण्यासाठी आक्रमणावर भर देण्याच्या प्रयत्नात भारताकडून गोल स्वीकारले गेले.

  • भारताची बेल्जियमविरुद्धची ही सलग दुसरी हार, त्यापूर्वीच्या सामन्यात २-३ पराभव
  • गेल्या पाच सामन्यांत भारताचा एकच विजय आणि दोन बरोबरी
  • २०१६ मध्ये बेल्जियम ऑलिंपिक उपविजेते, त्या स्पर्धेत भारत बेल्जियमविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत पराजित
  • ऑलिंपिक स्पर्धेनंतरच्या प्रतिस्पर्ध्यातील सात लढतीत बेल्जियमचे तीन विजय; तर भारताचा अवघा एक

अशी झाली लढत
तपशील               भारत     बेल्जियम

गोल/ शॉट्स            २/९        ५/२३
यशाची अचूकता     २२%       २२%
मैदानी गोल           १/४           १/८
पेनल्टी कॉर्नर         १/५         ३/१४
पेनल्टी स्ट्रोक्स          १            १
चेंडू वर्चस्व           ५२%        ४८%
गोलक्षेत्र प्रवेश         २०          २३
व्हिडीओ दाद          २            १
ग्रीन कार्ड                १            -


​ ​

संबंधित बातम्या