दिव्यांग खेळाडूंमध्येही उड्डाणाची ताकद दर्शवणारा उद्‍घाटन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 August 2021

आव्हानांचा डोंगर असला तरी पॅरालिंपिक स्पर्धाही यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास दर्शवत आणि विमानतळाची थीम निर्माण करत पॅरालिंपिक स्पर्धेने टेकऑफ केले. स्पर्धा दिव्यांगांची असली, तरी आम्हाला उड्डाण करण्याचे पंख आहेत, असा संदेश उद्‍घाटन सोहळ्यातून देण्यात आला.

टोकियो - आव्हानांचा डोंगर असला तरी पॅरालिंपिक स्पर्धाही यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास दर्शवत आणि विमानतळाची थीम निर्माण करत पॅरालिंपिक स्पर्धेने टेकऑफ केले. स्पर्धा दिव्यांगांची असली, तरी आम्हाला उड्डाण करण्याचे पंख आहेत, असा संदेश उद्‍घाटन सोहळ्यातून देण्यात आला.

कोरोनाच्या सावटाखाली याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्य ऑलिंपिक यशस्वीपणे पार पडली. आता त्याच टोकियोत पॅरालिंपिक स्पर्धेचे उद्‍घाटनाद्वारे बिगुल वाजले. उद्‍घाटन सोहळ्याला सुरुवात होण्यापासून ते खेळाडूंच्या ध्वजसंचलनानंतर झालेल्या एका कलाकृतीतून विमानतळ, रनवे आणि विमानाचे उड्डाण असे चित्र कलाकारांनी सादर केले.

कोरोनाचे सावट होते आणि राहीलही, पण आम्ही थांबणार नाही, असा संदेश टोकियोत पुन्हा देण्यात आला. ५७ वर्षांनंतर टोकियोत पुन्हा पॅरालिंपिक होत आहे. एकाच शहरात दोनदा पॅरालिंपिक होणारे टोकियो एकमेव शहर आहे. आजच्या उद्‍घाटन सोहळ्याचा सेट पॅरा एअरपोर्टचा होता. पॅरा अॅथलीटमध्येही उड्डाणाची ताकद आणि क्षमता असल्याचे त्यातून दाखवण्यात येत होते. विमानतळावर काम करणारे कर्मचारी कसे काम करतात त्यांचीही दखल घेण्यात आली आणि त्यानंतर स्टेडियमचा सभोवार नयनरम्य आतषबाजीने रंगून गेला.

सर्व सहभागी देशांतील खेळाडूंचे संचलन झाल्यानंतर व्हीलचेअरवर मुलगी बसली होती या व्हीलचेअरला विमानासारखे पंख लावण्यात आले होते. रनवेवरून ती पुढे पुढे जात होती. जोरदार वाऱ्याचा तिला अडथळा होत असतो तरी ती थांबत नाही. विजांचा कडकडाट होत असतो, पण व्हीलचेअरवर बसलेली ही मुलगी हार मानत नाही, असा भावनिक कार्यक्रम लक्षवेधक होता. 

लक्षवेधक

  • या स्पर्धेत विक्रमी ४४०३ खेळाडूंचा सहभाग
  • यामघ्ये २५५० पुरुष; तर १८५३ महिला खेळाडू
  • गतवेळेस रिओ २०१६ मधील स्पर्धेत ४३२८ खेळाडू
  • टोकियोत दुसऱ्यांदा पॅरालिंपिक स्पर्धा
  • भारताचेही सर्वाधिक ५४ खेळाडूंचे पथक

​ ​

संबंधित बातम्या