बळजबरीने परत घेऊनच कसे जाता ! बेलारूसच्या खेळाडूची विचारणा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 August 2021

बहुविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यावर खेळाडू यजमान देशात हरविण्याचे प्रमाण काही वर्षांपासून वाढत आहे, पण स्पर्धा इतिहासात कदाचित प्रथमच एखाद्या देशाच्या खेळाडूने स्पर्धा संपल्यावर मला सक्तीने परत कसे घेऊन जाता, अशी विचारणा केली आहे.

टोकियो - बहुविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यावर खेळाडू यजमान देशात हरविण्याचे प्रमाण काही वर्षांपासून वाढत आहे, पण स्पर्धा इतिहासात कदाचित प्रथमच एखाद्या देशाच्या खेळाडूने स्पर्धा संपल्यावर मला सक्तीने परत कसे घेऊन जाता, अशी विचारणा केली आहे.

बेलारूसची क्रिस्तिना त्सिमानौस्काया हिने स्पर्धेतील आव्हान संपल्यावर संघाच्या पथकासह परतण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तिने जपानमधील पोलंडच्या दूतावासात जाऊन आश्रयही मागितला. पोलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी क्रिस्तिला मानवतेच्या दृष्टिकोनातून व्हिसा देत असल्याचे सांगितले, तसेच तिला पोलंडमधून क्रीडा कारकीर्दही करता येईल असेही सांगितले; मात्र क्रिस्तिनाने टोकियोतील बेलारूसवासीय आपल्याला मदत करीत आहेत, तसेच त्यांनी आपल्या वतीने पोलंड दूतावासाशी संपर्क साधलाही आहे असे सांगितले. दरम्यान, क्रिस्तिनाच्या पतीनेही बेलारूस सोडले असून सध्या तो युक्रेनमध्ये आहे; मात्र तो पोलंडला जाणार का, याबाबत युक्रेन गृहमंत्रालयाने टिप्पणी करणे टाळले.

क्रिस्तिना २०० मीटर शर्यतीत सहभागी होणार होती, पण बेलारूसच्या पथकाने शर्यतीपूर्वीच आपल्याला विमानतळावर नेले. संघ तुर्कीश एअरलाईन्सने मायदेशी परतणार असल्याचे सांगण्यात आले, पण तिने विमानात बसण्यास नकार देत पोलंडचा दूतावास गाठल्याचे सांगण्यात येते. त्या वेळी तिने जपान पोलिसांचीही मदत घेतली असेही वृत्त आहे.

राजकीय विरोधाची पार्श्वभूमी
बेलारूसचे अध्यक्ष अॅलेक्झांडर लुकाशेन्को यांचा मुलगा व्हिक्टर लुकाशेन्को हा बेलारशियन राष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा प्रमुख आहे. अध्यक्षाच्या वादग्रस्त फेरनिवडीबद्दल निषेधात सहभागी झालेल्या खेळाडूंबाबत राष्ट्रीय समिती भेदभाव करत असल्याच्या आरोपावरून राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या मुलास टोकियो ऑलिंपिकला उपस्थित राहण्यावर बंदी लादण्यात आली आहे. 

‘बेलारूसमध्ये मला अटक होऊ शकते, याची भीती वाटत आहे. राष्ट्रीय संघातून बाहेर करण्याबाबत मी घाबरत नाही; पण माझ्या सुरक्षिततेबद्दल चिंता आहे,’ असे  त्सिमानौस्काया हिने सांगितल्याचे बेलारशियन स्पोर्टस सॉलिडेटरी फौंडेशनने म्हटले आहे. ही संस्था राजकीय वक्तव्य केलेल्या खेळाडूंना पाठिंबा देण्याचे काम करते. त्सिमानौस्काया युरोपमध्ये आश्रय घेण्याबाबत विचार करत आहे, असे या संस्थेने नंतर नमूद केले.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी त्सिमानौस्काया हिने टोकियोतील पोलंड दूतावासात प्रवेश केला होता.


​ ​

संबंधित बातम्या