भारत-पाक हॉकी मालिकेचे पुनरुज्जीवन?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 April 2021

पाक हॉकी महासंघाचे अध्यक्ष ब्रिगेडियर (निवृत्त) खलीद सज्जाद खोक्कर तसेच सचिव आसिफ बाजवा हे बैठकीसाठी दिल्लीत येणार आहेत.

कराची : पाकिस्तान हॉकीला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी पाक महासंघ प्रयत्न करणार आहे. जागतिक हॉकी महासंघाचे अधिवेशन मे महिन्यात दिल्लीत होणार आहे. त्या वेळी पाक हॉकी पदाधिकारी भारतीय महासंघाचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

जागतिक हॉकी महासंघाची बैठक १९ ते २३ मेदरम्यान नवी दिल्लीत आहे. याच बैठकीत नरिंदर बत्रा महासंघाचे अध्यक्षपदी कायम राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. या बैठकीत नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने आम्हाला भारतीय हॉकी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटता येणार आहे. त्या वेळी मालिकेबाबत चर्चा करणार आहोत. या मालिकेचा फायदा पाकिस्तान तसेच भारतीय हॉकीसच नव्हे, तर हॉकी जगतास होईल, असे पाक हॉकी महासंघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?

पाक हॉकी महासंघाचे अध्यक्ष ब्रिगेडियर (निवृत्त) खलीद सज्जाद खोक्कर तसेच सचिव आसिफ बाजवा हे बैठकीसाठी दिल्लीत येणार आहेत. त्यांनी यापूर्वीच भारतीय व्हिसासाठी अर्ज केला आहे. भारत-पाक मालिका ही त्रयस्थ ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव आहे. या मालिकेस पुरस्कर्ते लाभतील तसेच त्याच्या दूरचित्रवाणी हक्क तसेच मैदानातील जाहिरातीतून चांगले उत्पन्न मिळेल, असा पाक हॉकी महासंघास विश्वास आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या